नवी दिल्ली - विजयादशमीदिवशी फ्रान्सकडून राफेल विमान ताब्यात घेताना केलेल्या पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ''मला जे योग्य वाटले तेच मी केले. या विश्वात एक महाशक्ती आहे अशी आमची श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणासून या गोष्टीवर विश्वास आहे, असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान ताब्यात घेताना या लढाऊ विमानाची पूजा केली होती. विजयादशमी दिवशी संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या राफेल पूजनामुळे वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या पूजेवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही या पूजेवर टीका केली होती. पहिले राफेल विमान ताब्यात घेतल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भारतात परतले आहेत. मायदेशी परतल्यावर राफेलच्या पूजेवरून निर्माण झालेल्या वादाबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, ''या देशात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. जर अन्य कुणी असे केले असते, तर मी त्यावर आक्षेप घेतला नसता.''यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ''मला वाटते की, या प्रकरणात काँग्रेसमध्ये सुद्धा मतभिन्नता असावी. कुठल्याही विषयावर सर्वांचं एकमत असेलच, असे नाही.'' दरम्यान, राफेल विमान भारताच्या ताब्यात आल्याने भारतीय हवाई दलाच्या संरक्षण आणि आक्रमकतेच्या शक्तीत वाढ होईल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
राजनाथ सिंह यांनी यावेळी राफेल विमान उड्डाणावेळचा अनुभवही कथन केला. ''राफेल विमान प्रति तास 1800 किमी वेगाने उड्डाण करू शकते. मी या विमानातून ताशी 1300 किमी वेगाने उड्डाण केले. तसेच राफेल विमानाचा करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वामुळेच शक्य झाला, असे त्यांनी सांगिलते.
३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा