केंद्र सरकारने देशाच्या तिन्ही दलांसाठी सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांतून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारीही बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शने आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या. अग्निपथ योजनेच्या विरोधात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. या योजनेवर इतक्या व्यापक हिंसक विरोधाची अपेक्षा नव्हती, असे नौदल प्रमुख म्हणाले.
“मला अशाप्रकारच्या विरोधाची अपेक्षा नव्हती. आम्ही अग्निपथ योजनेवर जवळपास दीड वर्षे काम केले. भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील हे सर्वात मोठे परिवर्तन आहे. योजनेची चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे याचा विरोध होत आहे,” असं आर हरी कुमार म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. ही योजना मागे घेण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.
योजना समजून घेणं गरजेचं“मी लोकांना सांगू इच्छितो याला विरोध करू नका आणि हिंसक होऊ नका. त्यांनी ही योजना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे. तरूणांना देशसेवा करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. चार वर्षांच्या सैन्य सेवेनंतर तरुणांना भविष्यासाठी अधिक संधी दिली जाणार आहे. सेवा निधी पॅकेज चार वर्षांच्या सेवेनंतर उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश सैनिकांना चार वर्षांनी मुक्त केले जाईल. मात्र, काही जवान आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल. प्रशिक्षण १० आठवडे ते ६ महिन्यांचे असेल. या अग्नीवीरसाठी १०/१२ वीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात आलेल्या तरुणांना पहिल्या वर्षी ४.७६ लाखांचे पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षी हे पॅकेज ६.९२ लाखांवर जाईल. याशिवाय अन्य रिस्क आणि हार्डशिप भत्ते देखील दिले जातील. चार वर्षांनंतर सैन्य दल सोडावे लागणाऱ्या अग्निवीरांना ११.७ लाख रुपए सेवा निधी दिला जाईल, यावर कोणताही कर लावला जाणार नाही.