UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:18 AM2021-09-22T08:18:47+5:302021-09-22T08:20:08+5:30
आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. मुलगा आणि मुलीला चांगल देण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं. श्रीधन्याच्या आएएएस होण्याने या कष्टाचं चीज झालं.
नवी दिल्ली - स्पर्धा परीक्षा म्हटलं की संघर्ष आला, त्यातही परीस्थितीशी दोनहात करत या परिक्षेत स्वत:ला सिद्ध करायचं म्हटल्यास टोकाचा संघर्ष आला. मात्र, या स्पर्धेतही संकटांवर मात करुन आदर्श निर्माण करणारे, देशातील लाखो तरुणांना प्रेरणा देणारे उमेदवारही परीक्षेच्या निकालानंतर पाहायला मिळतात. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील श्रीधन्या सुरेशनेही अशाच संकटांवर विजय मिळवत युपीएससी परीक्षेत स्वत:ला सिद्ध केलंय.
श्रीधन्या सन 2018 साली युपीएससी परीक्षा दिली होती. त्यात पास होऊन आयएएस अधिकारी बनलेली श्रीधन्या सुरेश ही केरळमधील पहिली आदिवासी कन्या आहे. 7 हजार वस्तीच गाव असलेल्या पोजुथाना येथून श्रीधन्याच्या संघर्षाचा प्रवास सुरू होऊन आता दिल्लीत पोहोचला आहे. आपल्या प्रवासांतून तिने लाखो युवक-युवतींपुढे आदर्श निर्माण केला आहे. श्रीधन्या सुरेशचे आई-वडिल रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूर होते. त्यासोबतच, गावच्या बाजारात लाकडी धनुष्य-बाण विकण्याचं कामही ते करत.
आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. मुलगा आणि मुलीला चांगल देण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं. श्रीधन्याच्या आएएएस होण्याने या कष्टाचं चीज झालं. श्रीधन्याने प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतच घेतलं, त्यानंतर सेंट जोसेफ कॉलेजमधून झुलॉजी विषयात पदवी घेतली. तर, कोझीकोड येथील कालीकट युनिव्हर्सिटीतून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातील केरळमधील अनुसूचित जाती-जमाती विकास विभागात क्लर्क पदावर नियुक्ती मिळाली होती. मात्र, कॉलेज जीवनापासूनच सिव्हील सर्व्हीसेसची तयारी तिने सुरू केली होती.
श्रीधन्याने ठरवल्याप्रमाणे नोकरीसह आदिवासी विकास योजनेंतर्गत सुरू असलेल्या युपीएससी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. काही दिवसांनंतर तिरुवअनंतपुरम येथे जाऊन तिने तयारी सुरू केली. अनुसूचित जाती विभागाकडून आर्थिक मदत मिळाल्याने तिची आर्थिक भार हलका झाला. श्रीधन्याने 2018 साली देशात 410 वा क्रमांक प्राप्त करत युपीएससी परीक्षेतून आयएएस होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं.
श्रीधन्याने मुख्य परीक्षेत यश संपादित केल्यानंतर मुलाखतीच्या यादीत तिचं नाव आलं होतं. त्यावेळी, तिच्यासमोर मोठी आर्थिक अडचण होती. मुलाखतीस दिल्ली जाण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी, तिच्या मित्रांनी पैसे जमा करुन 40 हजार रुपये तिला दिले. मित्रांचाही विश्वास सार्थ ठरवत श्रीधन्याने मुलाखतीमध्येही आपली चुणूक दाखवली आणि युपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस बनली.