Sanjay Roy latest News : कोलकातामधील आरजी कर रुग्णालय आणि महाविद्यालयात महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. तीन तज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या टेस्टमध्ये संजय रॉयने धक्कादायक माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महिला डॉक्टरची हत्या केली नसल्याचे संजय रॉयने जबाबात म्हटले आहे. (sanjay roy statement)
सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही. आरोपी संजय रॉयला कोलकाता पोलिसांनी अटक केली होती. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयकडून संजय रॉयची चौकशी सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी सीबीआयने प्रेसिडन्सी तुरुंगात संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट केली.
संजय रॉयला विचारण्यात आले १० प्रश्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉयला पॉलिग्राफ टेस्ट वेळी दहा प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तीन पॉलिग्राफ टेस्ट तज्ज्ञ उपस्थिती होते. चाचणीवेळी नाव, पत्ता असे काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर बलात्कार आणि हत्येसंदर्भात चौकशी करण्यात आली.
सेमिनार हॉलमध्ये हत्या केल्यानंतर तू काय केले? तू कुठे गेला होता? असा प्रश्न संजय रॉयला विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना संजय रॉय म्हणाला की, "मी हत्या केली नाही. मी मृतदेह बघून सेमिनार हॉलमधून पळून गेलो."
बलात्कार आणि हत्या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही. सेमिनार हॉलमध्ये मृतदेह बघून मी घटनास्थळावरून फरार झालो होतो, असे संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टदरम्यान दिलेल्या जबाबात सांगितले.
संजय रॉयचा निर्दोष असल्याचा दावा
आरोपी संजय रॉयची वकील कविता सरकार यांनी तो निर्दोष असल्याचे दावे केले आहेत. "मी ज्यावेळी त्याला विचारले, तेव्हा त्याने मला सांगितले की, मी गुन्हा केलेला नाही. मला फसवण्यात आले आहे. या प्रकरणात सीबीआयला आतापर्यंत ठोस पुरावे सादर करता आलेले नाहीत. त्यांना तपास करू द्या. गुन्हा सिद्ध करू द्या", असे संजय रॉयच्या वकील म्हणाल्या.