बिष्णुपूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत शेवटच्या टप्प्यात येत असताना राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कडाडून टीका केली आहे. जो माणूस आपल्या बायकोचा संभाळ करू शकत नाही तो देशातील नागरिकांचा संभाळ कसा करणार? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर मी टोल कलेक्टर आहे तर तुम्ही कोण आहे? तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुमची पत्नी काय करते? ती कुठे राहते? तर त्यावर पंतप्रधानांकडे उत्तर नाही. जो स्वत:च्या पत्नीचा संभाळ करु शकत नाही तो भारतीयांचा संभाळ कसा करणार? असं त्या म्हणाल्या.
मी मोदींनी देशाचा पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी बैठकीत सहभागी झाली नाही. मी त्यांच्यासोबत एका मंचावर उपस्थित राहू इच्छित नाही. मी येणाऱ्या पंतप्रधानांशी चर्चा करेन. वादळामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही असंही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले.
मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष वाढत चाललेला आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतोय. इतकचं नाही तर फनी वादळासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्याऐवजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थीतीचा आढावा घेतला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममता यांनीच फोन घेण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली होती. तर ममता यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार करुन निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.