लॉकडाऊन काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर बॉलीवूड अभिनेता सोनू सूदचं नाव राजकीय वर्तुळातही खूप चर्चेचा विषय ठरलं. सोनू सूदच्या सामाजिक कार्यामुळे लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करू लागले. यातच सोनू सूद आता अभिनयानंतर आता राजकीय क्षेत्रातही उडी घेणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या. त्यावर सोनू सूदनं असा कोणताच इरादा नसल्याचं स्पष्ट करत अभिनय क्षेत्रातच राहणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सोनू सूदची बहिण मालविका हिनं राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा सोनू सूदचं नाव चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
सोनू सूदची बहिण मालविका पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे. पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून तिला काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या सोनू सूद देखील बहिणीच्या प्रचारासाठी मोगा येथेच आहे. यात सोनू सूद देखील काँग्रेसला पाठिंबा देत पक्ष प्रवेश करणार का याबाबत सोनू सूदनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
"मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व करत नाही. मी आजही एक सामाजिक कार्यकर्ताच आहे आणि जे काम आधीपासून करत होतो तेच आजही करत आहे. माझी बहिण देखील माझ्यासारखीच लहानपणापासूनच राजकारणापेक्षा समाजकार्याशीच अधिक जोडली गेलेली आहे. आमची ही चौथी पिढी आहे की जी सामाजिक कार्यात आहे. माझे आजोबा आणि पूर्वजांनी मोगामध्ये अनेक शाळा, रुग्णालयं उभारली आहेत. माझ्या आईनं आयुष्यभर लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं आहे. तर माझ्या वडिलांचं कपड्याचं दुकान होतं आणि ज्या गरीबांना लग्नाचा खर्च करणं परवडत नव्हतं अशांना माझे वडील मदत करत आले आहेत. आम्ही देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजकार्य करत आहोत. आताही मालविकानं मोगा मधील जनतेचं मोफन लसीकरण केलं आहे. शिक्षण असो किंवा मग आरोग्य सर्वच गोष्टींमध्ये मालविका आधीपासूनच खूप सक्रिय आहे. लोकांनी तिला राजकारणात येण्यासाठी आग्रह केला. तिनं माझ्याशीही याबाबत चर्चा केली आणि समाज बदलण्यासाठी प्रशासनात येणं गरजेचं असल्याचं तिचं मत आहे. त्यामुळेच मालविका आज राजकीय क्षेत्रात पाऊल टाकत आहे", असं सोनू सूदनं म्हटलं आहे.
राजकीय पक्ष नव्हे, मी देशासाठी काम करतो"मी ज्या ज्या राज्यात काही काम करतो तेव्हा तिथं त्या त्या राजकीय पक्षांबाबतच्या चर्चा माझ्याबाबत सुरू होतात. महाराष्ट्रात मी काम करत होतो तर हा भाजपा किंवा शिवसेनेसाठी काम करतो अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पंजाबमध्ये काम सुरू केलं तर आम आदमी आणि काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. माझ्यासाठी सर्व पक्ष, जात, धर्म एकच आहे. मी आज छत्तीसगढमध्ये एक रुग्णालय सुरू करतोय. उत्तराखंडमध्येही काम सुरू आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्येही काम करतोय. मी संपूर्ण देशाचा आहे. माझं काम मदत करणं आहे. माझ्यासाठी सर्व राज्य एकच आहेत", असं सोनू सूद म्हणाला.