नवी दिल्लीः सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही, पण ही परिस्थिती नक्कीच बदलेल, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटात देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंद्यांवर त्याचा परिमाण होत आहे. त्यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. बँकांशी संबंधित प्रश्न, मागणी आणि पुरवठ्यासह तरलतेच्या समस्या आहेत हे मी स्वीकार करतो. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सर्वात महत्त्वाची समस्या तरलता आहे. कोरोनाच्या संकटात बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला गती देऊ शकत नाही.बाजारात तरलता वाढवणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतून एमएसएमई, पायाभूत सुविधा, रस्ते क्षेत्र, जहाज वाहतूक, बंदर इत्यादी क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणण्यास आमचं प्राधान्य राहील. मार्चअखेरपर्यंत ग्रामीण भागातील उलाढाल 88,000 कोटी रुपये आहे. ती उलाढाल दोन वर्षांत ५ लाख कोटी रुपये करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमची प्राथमिकता कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराची क्षमता निर्माण करण्यावर राहणार असल्याचंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.तत्पूर्वी कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणा करण्यास केंद्र सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता.‘इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल’च्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी यांनी रविवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी ते बोलले होते. कोरोनाचे संकट हे तात्पुरते संकट आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून निराशेतून बाहेर पडले पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले. देशात आज सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे. याचा उपयोग करून निर्यातवाढीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले होते.