बंगळुरू - कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रमेश कुमार आपल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी प्रश्न विचारला असता रमेश कुमार यांनी 'मी पुरुषांसोबत झोपत नाही' असं उत्तर दिलं आहे. रमेश कुमार यांच्या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी मुनियप्पा यांनी 'रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही' असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुनियप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रमेश कुमार यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'मी पुरुषांसोबत झोपत नाही. मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत' असे रमेश कुमार यांनी म्हटले आहे. रमेश कुमार यांनी मुनियप्पा यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं असल्याची माहिती मिळत आहे.
...म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी बलात्कार पीडितेशी केली स्वत:ची तुलनाकर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. बलात्कार पीडितेला देखील त्या घटनेविषयी सारखे प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे आपली देखील अवस्था असल्याचे मंगळवारी (13 फेब्रुवारी) रमेश कुमार यांनी सांगितले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी होणाऱ्या आरोपांविषयी त्यांनी लक्ष वेधून घेतले होते.
सरकारने हे ऑडिओ क्लिप प्रकरण एसआयटीकडे सोपवले आहे. ऑडिओ क्लिपच्या एसआयटी चौकशीप्रकरणी विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले होते. भाजपा प्रदेश युनिटचे अध्यक्ष बी.एस.येदियुरप्पा यांना काँग्रेस-जद (एस) सरकार पाडण्याचा कथित प्रयत्नात जदच्या एका आमदाराला लालच दाखवण्याचा प्रयत्न ऑडिओ क्लिपमध्ये केला जात असल्याचे समोर येत आहे. सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे कारण तिला देखील त्या घटनेविषयी सारखे सारखे प्रश्न विचारले जात असतात असं रमेश कुमार यांनी म्हटलं होतं.