माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 04:44 PM2019-12-22T16:44:33+5:302019-12-22T16:50:05+5:30
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही मोदींनी काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेतला.
नवी दिल्ली: सीएए, एनआरसी हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी भाषणातून काँग्रेसला महात्मा गांधी यांची आठवण करुन दिली. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना असुरक्षित वाटल्यास, त्यांच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना सन्मानानं भारतात घ्या, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. काँग्रेसला माझं ऐकायचं नसेल, पण त्यांनी किमान गांधींनी सांगितलेली गोष्ट तरी ऐका असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना भारताचं नागरिकत्व देण्याची भूमिका मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना मांडली होती. मग आम्ही त्यापेक्षा काय वेगळं करतोय?, असा सवाल देखील नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित केला.
PM Narendra Modi: NRC came at the time of Congress. Were they sleeping then? We neither brought NRC in cabinet nor in Parliament. If we're passing a legislation to give you ownership rights, in the same session will we bring a legislation to send you out? pic.twitter.com/agEUvnwh9v
— ANI (@ANI) December 22, 2019
एनआरसीचा विषय ना संसदेत आलाय ना मंत्रिमंडळात, तरीही यावरुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरुन आम्ही आसाममध्ये एनआरसीची अंमलबजावणी केली. मात्र तरीही या मुद्द्यावरुन जनतेच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करण्याचं विरोधकांकडून केलं जात आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात आंदोलनं सुरू असताना काँग्रेसचे नेते शांततेचं आवाहन करत नाहीत. याचा अर्थ त्यांची आंदोलनातील हिंसेला मूकसंमती आहे. सार्वजनिक मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत मोदींना काँग्रेसवर तोफ डागली. आंदोलनातील हिंसाचारातून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. करदात्यांचा पैसा वाया घालवला जात आहे. पण यातून काय साधलं जाणार, गरिबांची वाहनं जाळून काय मिळणार, असे प्रश्न मोदींनी विचारले. तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असल्यास माझे पुतळे जाळा, त्याला जोडे मारा, असं मोदी म्हणाले.
भाजपाचे 2014 मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर मी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधाला आमंत्रण दिले होते. आम्ही नव्याने मित्र म्हणून हात पुढे केला होता. तसेच मी स्वत: लोहोरमध्ये गेलो होतो, परंतु त्या बदल्यात पाकिस्तानकडून आम्हाला धोका मिळाला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर केली आहे.
भारताचे जगातल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांसोबत चांगले संबंध आहेत. तसेच गेल्या 5 वर्षात मुस्लीम देशांनी अनेक भारतीय कैद्यांना सोडलं असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवं आयुष्य मिळणार असल्याचे देखील नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
#WATCH: PM Modi addresses a rally at Ramlila Maidan in Delhi https://t.co/BqdNaM3p8j
— ANI (@ANI) December 22, 2019