पाटणा, दि. 8 - नितीश कुमार यांच्यासोबत झालेल्या वादानंतर लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिलं आहे. विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी पत्राच्या माध्यमातून नितीश कुमारांकडे मदत मागितली आहे. तेजस्वी यादव यांनी अशावेळी मदत मागितली आहे जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तेजस्वी यादव यांना आपला सरकारी बंगला सोडायचा नसल्याने त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. अत्यंत आदरयुक्त भाषा वापरत हे पत्र लिहिण्यात आलं आहे.
एकेकाळी एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेत बसणारे आरजेडी आणि जेडीयू आज विरोधक म्हणून एकमेकांवर उभे आहेत. तेजस्वी यादव यांच्यामुळे सुरु झालेल्या वादाने बिहारमधील राजकीय समीकरणच बदलून टाकले. काही दिवसांपुर्वी सत्तेत असणारी आरजेडी आज विरोधी बाकावर आहे. नेहमी नितीश कुमारांवर टीका करणारे तेजस्वी यादव यांनी पत्र लिहिताना मात्र खूपच नरमाईची भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्रीपदी नसणारे तेजस्वी यादव यांना सरकारी बंगला सोडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. पण पद गेलं असलं तरी आपला बंगला रिकामा करण्यासाठी तेजस्वी यादव इच्छुक नाहीत. त्यामुळेच त्यांनी नितीश कुमार यांना पत्र लिहून विनंती केली आहे.
तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असताना सर्क्युलर रोडवरील सरकारी बंगला त्यांना देण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांनी महाआघाडी तोडत भाजपाचं कमळ हाती घेतलं आणि आपलं सरकार नव्याने स्थापन केलं. तेजस्वी यादव यांच्या जागी सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. त्यामुळे हा बंगला आता त्यांना द्यायचा आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तेजस्वी यादव यांना गेल्या आठवड्यात नोटीस पाठवण्यात आली आहे. तेजस्वी यादव हा बंगला खाली करण्यासाठी मात्र तयार नाहीत. तेजस्वी यादवचे वडिल लालू प्रसाद यादव यांचा बंगला जवळच असल्याने तेजस्वी यादव यांना बंगला सोडायचा नाहीये. सुशीलकुमार मोदी सध्या ज्या बंगल्यात राहत आहेत, तो बंगला तिथून थोड्याच अंतरावर आहे. मात्र तेवढ्या दूर जाण्यासही तेजस्वी यादव तयार नाहीत.
ज्या बंगल्यात सुशीलकुमार मोदी राहत आहेत, तो त्यांना 2005 रोजी उपमुख्यमंत्री असताना देण्यात आला होता. पण 2013 रोजी नितीश कुमारांनी भाजपाची साथ सोडत आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडी केली. पण त्यावेळी सुशीलकुमार मोदींचा बंगला बदलण्यात आला नव्हता अशी आठवण तेजस्वी यादव यांनी करुन दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रात नितीश कुमार यांचा 'चाचा' असा उल्लेख करण्यात आला आहे. तेजस्वी नेहमी त्यांना चाचा असंच म्हणतात. आता नितीश कुमार मदत करतात की नाही हे पहावं लागेल.