नवी दिल्ली : काही राजकीय पक्ष माझ्याआडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा घणाघाती आरोप करून दिव्य पुत्रजीवक बीज हे औषध केवळ मुलगा व्हावा यासाठी नाही. तर ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे, असा खुलासा योगगुरू रामदेवबाबा यांनी शुक्रवारी केला. सोबतच ना मला मूल हवंय, ना मोदींना असे विचित्र विधान करून ते खासदारांवर जाम भडकले आणि त्यांनी खोट्या आरोपांबद्दल क्षमा मागावी अशी मागणी केली.संयुक्त जनता दलाचे खासदार के.सी. त्यागी यांनी गुरुवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला होता. आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी याप्रकरणी कारवाईचे आश्वासनही दिले होते. या आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यानंतर मुलगाच होतो, या दाव्यासह संबंधित औषधाची विक्री सुरूअसल्याचा आरोप त्यागी यांनी केला होता. पुरावा म्हणून त्यांनी सभागृहात ‘दिव्य पुत्रजीवक बीज’ औषधाचे एक पाकीट दाखवले होते. त्याच्या प्रत्युत्तरात रामदेवबाबांनी येथे एक पत्रपरिषद घेऊन या औषधासंदर्भात लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. आयुर्वेदाचे ज्ञान नसलेले लोक अशी चुकीची माहिती पसरवित असल्याचा आरोप करून ते म्हणाले, संसद ही देशातील महत्त्वाचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ आहे. परंतु काही लोक फकिराच्या आड वजिराला बदनाम करण्याची खेळी खेळीत आहेत. जे पंतप्रधानांवर थेट हल्ला करू शकत नाहीत ते अशा आडमार्गाचा वापर करीत आहेत. संसदेत विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी या औषधाचे नाव कदापि बदलले जाणार नाही. दिव्य पुत्रबीजक औषधावर ते केवळ पुत्रप्राप्तीसाठी आहे असे लिहिण्यात आलेले नाही. परंतु आता मात्र यावर बाळाचे लिंग ठरविण्याशी याचा काहीही संबंध नसल्याची सूचना असेल, अशी स्पष्टोक्ती योगगुरूंनी दिली. आपल्याला ना सत्तेचा लोभ आहे ना खासदार,आमदार बनण्याची इच्छा आहे. भारतरत्न किंवा पद्म पुरस्काराचीही अभिलाषा नाही, असे प्रतिपादन नाराज रामदेवबाबांनी यावेळी केले. समाजवादी पार्टीच्या सदस्य जया बच्चन यांनीही या औषधाविरुद्ध वक्तव्य केले याकडे लक्ष वेधले असता त्यांचे पती सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना आपणच योगशास्त्राचे धडे दिल्याचा दावा त्यांनी केला. सोबतच जया बच्चन यांना आता चित्रपटात काम मिळत नसल्याने त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करावा, असा सल्लाही रामदेवबाबांनी दिला. (वृत्तसंस्था)
ना मला मूल हवंय, ना मोदींना !
By admin | Published: May 01, 2015 10:53 PM