नवी दिल्ली - पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलने आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आपला नेता मानत नाही असं म्हटलं आहे. हार्दिक पटेलने शुक्रवारी मुंबईत एका चर्चेदरम्यान हे वक्तव्य केलं. यासोबतच राहुल गांधींची बहिण प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय नेता म्हणून पाहण्याची इच्छा असल्याचंही हार्दिक पटेलने म्हटलं आहे. ते बोलले की, 'मी राहुल गांधींना व्यक्तिगतपणे पसंत करतो, पण मी त्यांनी एक नेता म्हणून पाहत नाही'. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांनी एकत्र काम केलं होतं. काँग्रेसने त्यांच्या आंदोलनाला पूर्ण समर्थन दिल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
यावेळी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीवर बोलताना आपण भलेही 25 वर्षांचे होत असलो तरी त्यात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते बोलले की, 'मी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढणार नाही. खरंतर पुढील वर्षी मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पात्र होत असलो तरी पुढची निवडणूक लढायचीच नाही असं मी ठरवलं आहे'. वय कमी असल्या कारणाने हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणूक लढू शकला नव्हता.
पुढे बोलताना हार्दिक पटेलने सांगितलं की, 'मी निवडणूक लढण्यासाठी पात्र होत असलो, तरी मी निवडणूक लढणार नाहीये. मला वाटतं ज्यांच्या अधिकारांसाठी मी लढत आहे त्यांच्या जवळ राहणं गरजेचं आहे. ज्या लोकांचं विधानसभा किंवा संसदेत मी प्रतिनिधित्व करणार आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेणं सध्या जास्त गरजेचं आहे. सर्वात आधी लोकांबद्दल मला चांगल्या प्रकारे माहिती मिळवायची आहे. सध्या याची गरज जास्त आहे'.
हार्दिक पटेलने महाराष्ट्रात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर जोर दिला. भाजपाचा पराभव करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. 'जर सोशल मीडियाचा वापर करुन कोणी गुजरातचा मुख्यमंत्री होऊ शकत असेल, तर याच सोशल मीडियाचा वापर करुन महाराष्ट्र सरकारमधून भाजपाला हटवलं जाऊ शकतं', असं हार्दिक पटेल बोलला आहे.