राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता राज्यामध्ये महायुतीचा भाग होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज ठाकरे यांना महायुतीत सहभागी करून घेण्याची जवळपास संपूर्ण योजना बनवली आहे. राज ठाकरे आता दिल्लीत आहेत. ते चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा माध्यमांत आहे. ते एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. असे झाल्यास, या राजकीय घटनेचा परिणाम थेट शिवसेनेवरही (उद्धव ठाकरे गट) होऊ शकतो.
राज ठाकरे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता पुत्र अमित ठाकरे तसेच इतर काही सहकाऱ्यांसोबत दिल्लीत दाखल झाले आहेत. ते अमित शाह यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताज मानसिंह येथे थांबले आहेत. यासंदर्भात काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता, "माझ्याकडे आत्ता बोलण्यासारखे काही नाही. मला काही माहीत नाही, फक्त या असे सांगितले आहे," असे त्यांनी म्हटले आहे. राज आणि भजपचे वरिष्ठ नेते यांच्यात होणाऱ्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मनसेला मिळू शकते दक्षिण मुंबईची जागा? -मनसे महायुतीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभेच्या किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, मनसे महायुतीत सहभागी झाल्यास महायुतीला अधिक बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते.
फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक -तत्पूर्वी, दिल्ली येथील भाजप मुख्यालयात शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची महाराष्ट्र भाजप कोअर समितीचे सदस्य फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली. राज्यातील उरलेल्या २८ जागांचे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कसे वाटप करायचे यावर त्यांची चर्चा झाली. मंगळवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यात राज्यातील भाजप उमेदवारांची नावे निश्चित होणार आहे.