कुरनूल - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याआधी वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवन यांनी राष्ट्रगीतासंदर्भातील आपलं मत व्यक्त केलं आहे.
'चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उभे राहायला आवडत नाही. कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर निवांत चित्रपट पाहण्याच्या उद्देशाने चित्रपटगृहात गेल्यानंतर आधी प्रत्येकाला आपण देशभक्त असल्याचे दाखवावे लागते, हे चुकीचे आहे,’ असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे.
'राजकीय पक्ष त्यांची बैठक सुरू करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?, देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे. जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा' असं मत पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. तसेच राष्ट्रगीतासंदर्भात राजकीय पक्षांना आणि नेत्यांना प्रेम नाही का अशा आशयाचा प्रश्न पवन कल्याण यांनी उपस्थित केला आहे. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या एका निर्णयामध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. त्यावेळीही पवन कल्याण यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली होती.
पवन कल्याण यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होईल ही गोष्ट एका भाजपा नेत्याने दोन वर्षांपूर्वीच आपणास सांगितली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दाम युद्ध जनतेवर लादले जात असेल तर देशातील परिस्थिती काय आहे हे समजू शकते असेही त्यांनी म्हटले होते. तसेच पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. देशभक्तीचा मक्ता एकट्या भाजपाचा नाही. भाजपावाल्यांपेक्षा आम्ही दहा पटीनी राष्ट्रभक्त आहोत. मुसलमानांना देशभक्ती सिद्ध करण्याची मुळीच गरज नाही असे सांगतानाच समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न ‘जनसेना’ उधळून लावेल असे ते म्हणाले होते.