लखनौ - जवळपास वर्षभर कोरोनाच्या संसर्गाचा छायेखाली वावरल्यानंतर आता नव्या वर्षाच्या सुरुवातील कोरानावरील लस आणि लसीकरणाबाबत सकारात्मक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मात्र कोरोनाच्या लसीकरणावरून आता राजकारणालाही सुरुवात झाली आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लसीबाबत अजब आणि धक्कादायक विधान केले आहे. माझा भाजपावर विश्वास नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सरकारकडून देण्यात येणारी कोरोनावरील लस घेणार नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.भाजपाला टोला लगावताना समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले अखिलेश यादव म्हणाले की, जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही.यावेळी अयोध्येतील आलेले साधू संत, मौलाना आणि शीख समुदायाच्या लोकांना अखिलेश यादव यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गंगा-जमुनी तहजीब एका दिवसात विकसित झालेली नाही. ती विकसित व्हायला हजारो वर्षे लागली आहेत. मी धार्मिक माणूस आहे. माझ्या घरात मंदिर आहे. माझ्या घराबाहेरही मंदिर आहे. भगवान राम सर्वांचे आहेत. संपूर्ण जगाचे आहेत.यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपावर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशाने खूप कठीण दिवस पाहिले आहेत. एवढे वाईट आणि काळे दिवस आम्ही पाहिले नव्हते. उत्तर प्रदेश सरकारने एवढी खोटी आश्वासने दिली आहेत की, आपण कल्पानाच करू शकणार नाही.
"भाजपावर विश्वास नाही, त्यांची कोरोनावरील लस घेणार नाही’’, अखिलेश यादव यांचे अजब विधान
By बाळकृष्ण परब | Published: January 02, 2021 4:05 PM