मुंबई : देशात कोरोनाची लाट हळूहळू ओसरत असल्याने विविध राज्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र असे असले तरी अद्याप देशातील ७६ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले आहे. जोपर्यंत आम्ही राहत असलेल्या ठिकाणचे संपूर्ण लसीकरण होऊन कोरोना संख्या शून्यावर येत नाही किंवा मुलांना लस मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळांमध्ये पाठविण्याचा धोका आपण पत्करू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.
ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधांअभावी ग्रामीण भागातील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असता शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. पण ‘लोकल सर्कल’कडून मार्च २०२० पासून आतापर्यंत शाळा सुरू करण्याच्या बाबतीत शिक्षक, तज्ज्ञ, पालक विद्यार्थ्यांचे आतापर्यंत ६ वेळा सर्वेक्षण केले आहे. यात देशाच्या २९३ हून अधिक जिल्ह्यांतून १० हजारांहून अधिक पालकांनी मत व्यक्त केले.
तिसऱ्या लाटेचा धसका
४९ टक्के पालक मुलांचे लसीकरण व जिल्ह्यातील शून्य रुग्णसंख्या यावर ठाम आहेत. सर्वेक्षणांचा विचार करता मागील चार महिन्यांत पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी ही ६९ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर आली आहे. यावरून तिसऱ्या लाटेचा धसका पालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.