ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - गोमांस बंदीवरुन केंद्र सरकारमधील मंत्र्यांमध्येच जुंपण्याची चिन्हे असून मी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणारं असे आव्हान केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे. प्रत्येक राज्यामधील चित्र वेगळे असून महाराष्ट्र, गुजरातसारख्या हिंदुंची संख्या जास्त असलेल्या राज्यांमध्ये गोमांस बंदी केली असेल तर तो त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
बीफ (गोमांस) खाणा-यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावे असे विधान केंद्रीय राज्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावर किरण रिजिजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षातील नेत्यांनाच खुले आव्हान दिले आहे. भारतात लोकशाही असून प्रत्येक राज्यातील भावना वेगवेगळ्या असतात. मिझो ख्रिश्ननांमध्ये गोमांस खाण्याची पद्धत असेल तर त्यावर पंजाब किंवा हरियाणात राहणा-यांनी आक्षेप घेण्याची गरज काय असा सवालही रिजिजू यांनी उपस्थित केला.