उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मनोज सोनी नावाच्या एका तरुणाने जीवन संपवलंय. तसेच तत्पूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आणि रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमधून त्याने आपली आई आणि मोठ्या भावाला आपल्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. तसेच आई आणि मोठ्या भावावर व्हिडीओमधून गंभीर आरोप केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला होता. मात्र याबाबत समोर येऊ लागलेल्या माहितीनंतर जौनपूरमधील जाफराबाद पोलिसांनी व्हायरल व्हिडीओ आणि मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर मृत मनोजची आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा भावंडांमध्ये पाचव्या क्रमांकावरील असलेल्या मनोज याने आपण उचललेल्या टोकाच्या पावलासाठी आई उषा देवी हिला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान, मृत मनोज सोनीची पत्नी मान्यता हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर मनोज सोनी याची आई, भाऊ संतोष कुमार आमि त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मनोज याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज म्हणतो की, आई एका भावाचा हक्क हिरावून दुसऱ्या भावाला देऊ इच्छित आहे. घ्या, मी धनदौलतीसोबत माझे प्राणही तुम्हाला देतो. या व्हिडीओमधून मनोजने त्याची पत्नी आणि बहिणीलाही शेवटचा संदेश दिला आहे. मी आता जातोय. मला माफ करा, स्वत:ची आणि मुलांची काळजी घ्या. मान्यता तुझी आणि मुलांची खूप आठवण येतेय. मी मरू इच्छीत नाही. अनेकदा लटकण्याचा प्रयत्न केला. पण लटकू शकलो नाही. नाईलाजास्तव मला हे पाऊल उचलावं लागत आहे.
जौनपूर जिल्ह्यातील जफराबाद येथील रहिवासी असलेल्या मनोज सोनी याने २३ डिसेंबर रोजी रात्री आपल्या राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं होतं. या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात होत असतानाच मनोज सोनी याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती. जीवन संपवण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ७ मिनिटे १० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मनोज याने आई आणि भावावर गंभीर आरोप केले होते.