कोझीकोडे - तेलंगणामध्ये काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत भाषणे करताना अतिउत्साही अनुवादकामुळे आलेल्या अडचणींचा कसा सामना करावा लागला याचे काही रंगतदार किस्से त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.
तेलंगणात एका प्रचारसभेत मी जे सांगत होतो त्याच्यापेक्षा अनुवादक वेगळेच काही सांगत होता. अशा वेळी मोठी अडचण होते, असेही राहुल गांधी म्हणाले. केरळमधील कोझीकोडे येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभात राहुल गांधी यांनी हे किस्से सांगितले. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या भाषणाचा श्रोत्यांसाठी अनुवाद करण्याचे काम आययूएमएलचे खासदार अब्दुस्समद समदानी हे करत होते. या प्रसंगी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. (वृत्तसंस्था)
‘समदानी करतील अचूक अनुवाद’तेलंगणामध्ये अनुवादकाचा जो अनुभव आला तो केरळमधील पुस्तक प्रकाशनात येणार नाही. खासदार अब्दुस्समद समदानी हे माझ्या भाषणाचा नेमक्या शब्दांत अनुवाद करतील याची मला खात्री आहे, अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिप्पणी केली.
...तेच अधिक बोलत- समदानी यांच्याकडे राहुल गांधी म्हणाले की, एका सभेत मी जे सांगत होतो, त्यापेक्षा अनुवादकच जास्त बोलत होता. मी हिंदीतून पाच-सहा शब्दांचे बोललेले वाक्य अनुवादक तेलुगूमध्ये २० ते ३० शब्दांचे करून सांगत होता. - मी हिंदीतून एखादे कंटाळवाणे विधान केले तरी अनुवादक ते तेलुगूमध्ये अशा रीतीने सांगत की श्रोते जोरदार टाळ्या वाजवत. जेव्हा मी जोशपूर्ण विधान करत असे तेव्हा अनुवादकाच्या करामतीमुळे श्रोते काहीही प्रतिसाद देत नसत.