मिर्झापूर: कपबशा धुवत आणि लोकांना चहा देत मी लहानाचा मोठा झालो. मोदी व चहाचे नाते खूप गहिरे आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले. रालोआचा घटकपक्ष असलेल्या अपना दल-एसचे कपबशी हे निवडणूक चिन्ह आहे. मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
मोदी रालोआचा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातील अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल, रॉबर्टसगंजमधील उमेदवार रिंकी कोल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, आज मी भाषण न करता तुमच्याशी गप्पाटप्पा करेन. तुम्ही-आम्ही जेव्हा घर उभारतो आणि घर उभारताना एखादा मिस्त्री ठेवतो. तेव्हा आपण काय दर महिन्याला नवा मिस्त्री ठेवतो का? म्हणजे एक महिना हा मिस्त्री काम करेल, दुसऱ्या महिन्यात दुसरा, तिसऱ्या महिन्यात तिसरा आणि चौथ्या महिन्यात चौथा. असे झाले तर ते घर बांधून तरी पूर्ण होईल का? तसेच ते घर राहण्यालायक असेल का असा सवाल मोदींनी केला.
इंडिया आघाडी समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते!
मऊ (उप्र): काँग्रेस आणि सपाची इंडिया आघाडी भारतातील बहुसंख्याक समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला. ते म्हणाले की, ‘पूर्वांचलची ही भूमी शौर्य आणि क्रांतीची भूमी आहे. सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाहीने पूर्वांचलला माफिया, दुर्भिक्ष्य, दारिद्र्य व असहाय्यतेचे क्षेत्र बनवले आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून पूर्वांचल देशाच्या पंतप्रधानांची आणि सात वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड करत आहे आणि म्हणूनच पूर्वांचल हे सर्वात खास आहे.
हे लोक कट्टर जातीयवादी आहेत...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जातीयवादी असल्याची टीका केली.
- मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी या आघाडीने राज्यघटना बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. देशातील जनतेने इंडिया आघाडीला पुरेपूर ओळखले आहे.
- हे लोक कट्टर जातीयवादी आहेत. जेव्हा ते सरकार स्थापन करतील तेव्हा ते या आधारावरच निर्णय घेतील, असा दावाही मोदींनी केला.
पाच वर्षांत पाच पंतप्रधान योग्य आहे?
छोटे घर बांधत असतानाही कोणी वारंवार मिस्त्री बदलत नाहीत. मग पाच वर्षांत पाच पंतप्रधान बदलणे कितपत योग्य आहे, असा सवाल मोदींनी केला.