ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २५ - वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नीने देश सोडून जाण्याबद्दल सुचवले होते, या वक्तव्यामुळे देशवासियांच्या टीकेचा धनी झालेल्या आमिर खानला संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानने पाठिंबा दर्शवला असून काही महिन्यांपूर्वी मलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता, असे म्हटले आहे. पणजीतील ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तो बोलत होता.
प्रेषित मोहम्मद यांच्या पैगंबर यांच्यावर आधारित ' मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड' या इराणी चित्रपटाला संगीत दिल्यामुळे मलाही धार्मिक कट्टरतावाद्यांचा रोष सहन करावा लागला होता असे रेहमान म्हणाला. कोणत्याही मुद्द्यावर होणारा विरोध हा हिंसक नसावा. आपण सभ्य माणसं आहोत आणि आपण हे जगालाही दाखवून दिले पाहिजे. तुमचा विरोध दर्शवण्यासाठी नेहमीच एक चांगला मार्ग असतो, असं रेहमान म्हणाला.
'मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड' चित्रपटाला संगीत देण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर रझा अकादमीने रेहमान विरोधात फतवा जारी केला होता. सिनेमाच्या शीर्षकावरून पैगंबरांचा अपमान होतो, असा दावा काही जणांनी तेव्हा केला होता. मात्र मी या चित्रपटाचा निर्माता नाही, मी फक्त चित्रपटाला संगीत दिले असे रेहमानने स्पष्ट केले होते. तसेच मी परंपरावादी असलो तरी तर्कानुसारच विचार करतो, या चित्रपटाला संगीत दिले नसते तर मग पुढे अल्लाला काय उत्तर दिले असते असे उत्तर रेहमानने कट्टरतावाद्यांना दिले होते. या वादानंतर दिल्ली व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी रेहमानचे कार्यक्रम रद्द केले होते, तर विश्व हिंदू परिषदेने त्याला पुन्हा हिंदू धर्मात येण्याचे आवाहन केले होते. रेहमानची 'घर वापसी'ची वेळ झाल्याचे विहींपने म्हटले होते.