Narendra Modi Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बारासातमध्ये नारी शक्ती वंदन अभिनंदन कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी एक जुना किस्सा सांगितला. 'मी अगदी लहान वयात घर सोडले होते. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो. काहीतरी शोधत होतो. माझ्या खिशात एक पैसाही नव्हता, पण मी कधीही उपाशी राहिलो नाही. कुणीही मला काहीतरी खायला आणून द्यायचे,' असं मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'मी अनेक वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो. अनेकदा माझ्याकडे पैसे नसायचे, पण मी कधीही उपाशी राहिलो नाही. म्हणूनच मी म्हणतो की, हे 140 कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणते, मी मोदींचा परिवार आहे! जेव्हा मोदींना कोणतीही समस्या येते, तेव्हा या माता, बहिणी आणि मुली ढाल बनून उभ्या असतात. माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण या कुटुंबाला समर्पित आहे.
टीएमसीने घोर पाप केले संदेशखली घटनेचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले की, संदेशखलीमध्ये टीएमसीने घोर पाप केले. या घटनेमुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ममता सरकार महिला-मुलींवर विश्वास ठेवत नाही. टीएमसी सरकारला महिलांचे कल्याण नकोय. ममता सरकार राज्यातील महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही. टीएमसी सरकार बंगालमधील महिलांच्या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली.