महाठग सुकेश चंद्रशेखरने मंडोली कारागृहातूनच दिल्लीच्या एलजींना पत्र लिहिलं आहे. सुकेश चंद्रशेखरने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानातील सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी मोठ्या प्रमाणात महागड्या वस्तू खरेदी केल्याचा दावा सुकेशने केला आहे. केजरीवाल यांनी सीएम हाऊससाठी लाखो रुपयांना राल्फ लॉरेन, व्हिजनियर या कंपन्यांच्या वस्तू खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे .याशिवाय केजरीवाल यांच्यावर दक्षिण भारतीय व्यावसायिकाकडून चांदीचा क्रॉकरी सेट 90 लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे.
सुकेशने दावा केला की, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सुकेशकडून नूतनीकरणासाठी महागडे फर्निचर आणि बेड खरेदी केले होते, ज्याची सध्या चौकशी सुरू आहे. सुकेश म्हणाला, मी केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांना व्हॉट्सएप आणि फेस टाईम चॅटद्वारे पाठवलेल्या चित्रांच्या आधारे केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनी फर्निचरची निवड केली होती. पत्रात म्हटले आहे की, 15 प्लेट्स आणि 20 चांदीचे ग्लास, काही मूर्ती आणि अनेक वाट्या, चांदीचे चमचे, सरकारी निवासस्थानी वितरित करण्यात आले.
"डायनिंग सेट, ज्याची किंमत 45 लाख"
सुकेशने पत्र लिहून आरोप केला आहे की, मी स्वतः हे फर्निचर मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिले आहे. ऑलिव्ह ग्रीन गोमेद दगडापासून बनवलेला 12 सीटर डायनिंग सेट, ज्याची किंमत 45 लाख आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या बेडरूमसाठी आणि मुलाच्या बेडरूमसाठी 34 लाखांचे ड्रेसिंग टेबल खरेदी केले. आरोपानुसार, केजरीवाल यांनी त्यांच्या घरात 18 लाख रुपये किमतीचे 7 ग्लास खरेदी केले. याशिवाय राल्फ लॉरेनकडून एकूण 30 नग, चादरी, उशा खरेदी केल्या, ज्याची किंमत 28 लाख रुपये आहे. यासोबतच 45 लाख रुपयांची 3 भिंतीवरची घड्याळे खरेदी करण्यात आली.
"मी केजरीवालांसाठी फर्निचर खरेदी केले"
सुकेशने सांगितले की, हे सर्व फर्निचर मी मुंबई आणि दिल्ली येथून बिलिंगवर खरेदी केले आहे, कारण हे सर्व फर्निचर इटली आणि फ्रान्समधून आयात केले आहे. तसेच सर्व फर्निचर थेट अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचवले गेले आणि माझ्या कर्मचारी ऋषभ शेट्टीने ते निवासस्थानी ठेवलं असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.