Baba Ramdev on Viral Video: बाबा रामदेव यांच्या एका विधानावरून वाद चिघळला आहे. वाद चिघळताच बाबा रामदेव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या एका व्हायरल विधानाबाबत योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, त्यांनी ओबीसीवर नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टिप्पणी केली होती. खरं तर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी ओबीसींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर पतंजलीवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) सुरू झाला.
दरम्यान, आता 'पीटीआय' या वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाद चिघळल्यानंतर वादाशी संबंधित एका प्रश्नावर ते म्हणाले, "मी कोणतेही वादग्रस्त विधान केले नाही. ओवेसी आणि त्यांच्या पूर्वजांची नेहमीच देशविरोधी विचारसरणी होती. मी ओवेसीबद्दल बोलत होतो ओबीसीबद्दल नाही. त्यामुळे याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मी ओबीसींच्या विरोधात कधीच बोललो नाही. ओबीसींबाबत कोणतेही विधान केले नाही."
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव ब्राह्मण असल्याचे सांगत आहेत. ते म्हणाले होते, "मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे. लोक म्हणतात की बाबाजी ओबीसी आहेत... मी वेदी ब्राह्मण, मी द्विवेदी ब्राह्मण, मी त्रिवेदी ब्राह्मण आणि मी चतुर्वेदी ब्राह्मण आहे. मी चार वेद वाचले आहेत."
बाबा रामदेव यांना वादग्रस्त विधानाप्रकरणी सोशल मीडियावर लक्ष्य केले जात आहे. #BabaRamdev_Mafi_Mango हॅश टॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी #Boycott_Patanjali लिहून पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही सुरू केली.