हैदराबाद - आई वडील स्वत:च्या मुलांवर किती प्रेम करतात हे सांगण्याची गरज नाही. परंतु एक मुलगा त्याच्या आजारपणावरून आई वडिलांसाठी डॉक्टरांकडे जी विनवणी करत होता ते ऐकून डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. हैदराबाद येथे ६ वर्षीय मुलाला कॅन्सरसारखा जीवघेणा आजार जडलाय. जेव्हा याची माहिती मुलाला झाली तेव्हा त्याने मला कॅन्सर झालाय हे आई वडिलांना सांगू नका अशी विनवणी डॉक्टरांकडे केली.
हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. सुधीर गुप्ता यांनी हा अनुभव ट्विटरला शेअर केला आहे. मला कॅन्सर झालाय हे समजताच आई वडील दुखी होतील आणि त्यांना त्रास होईल असं मुलानं डॉक्टरला म्हटलं. सुधीर गुप्ता यांनी म्हटलंय की, एका ६ वर्षाच्या मुलानं मला सांगितले, मला ग्रेड ४ चा कॅन्सर झालाय. मी केवळ ६ महिनेच आणखी जगेन. हे माझ्या आई वडिलांना सांगू नका. मी या आजाराबद्दल सर्वकाही वाचलंय. मला माहित्येय मी फक्त ६ महिने जिवंत राहू शकतो. परंतु हे माझ्या आई वडिलांना सांगू नका. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे या आजारपणाबद्दल त्यांना सांगू नका असं मुलाने डॉक्टरला म्हटलं.
ओपीडीमध्ये एका जोडप्याच्या सांगण्यावरून डॉक्टर त्या मुलाला एकांतात भेटले. आई वडिलांनी म्हटलं की, मनु बाहेर वाट पाहतोय. त्याला कॅन्सर आहे परंतु आम्ही त्याच्यासमोर याचा खुलासा केला नाही. मनुच्या आई वडिलांनी म्हटलं की, कृपया त्याला पाहा आणि उपचार करा. मात्र हे आम्हाला माहित्येय आहे याचा उल्लेख करू नका. आई वडिलांचं बोलणं ऐकून डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली. मनु व्हिलचेअरवर बसला होता. तो हसत होता. आत्मविश्वास होता असं डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, मेडिकल हिस्ट्री आणि रेकॉर्डचा आढावा घेतल्यानंतर मनुला डोक्याच्या डाव्या बाजूस ग्लियोब्लास्टोमा मल्टीफॉर्म ग्रेड ४ असल्याचं कळालं. ज्याच्यामुळे त्याच्या डाव्या हाताला आणि पायाला लकवा मारला. त्याचे ऑपरेशन केले होते. आणि किमोथेरेपी सुरू होती. ब्रेन कॅन्सरमुळे त्याचं ऑपरेशन करावं लागलं असं डॉक्टरांनी म्हटलं. डॉक्टरांनी मनुच्या आई वडिलांसोबत उपचारांची चर्चा केली.