-शायना एन. सी., भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या
‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी ते मथुरेच्या खासदार हा तुमचा प्रवास कसा घडला?
मी माझ्या आयुष्यात काहीच ठरवलेले नव्हते. संधी आल्या तशा मी त्या स्वीकारत गेले आणि रस्ता दिसला, तशी पुढे निघाले. रस्ता दिसला नाही, तेव्हा तो शोधण्याचे प्रयत्न करीत राहिले. राजकारणातही मी अशीच आले. त्याची इच्छा बाळगलेली नव्हती.
तुम्ही मूळच्या दक्षिणेतल्या. मुंबईमध्ये आपले करिअर घडले. नंतर राज्यसभेच्या सदस्य होतात आणि निवडणूक लढवली ती मात्र मथुरेतून?
सिनेमा क्षेत्रात मी बरेच काम केले. लग्न झाले, मुली झाल्या, त्यांचे आयुष्य मार्गी लागत गेले, तरीही मी काम करीत राहिले. त्या काळात भारतीय जनता पक्ष पुढे येत होता. माझे सहकारी विनोद खन्ना त्यावेळी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत होते. त्यांनी मला प्रचाराला बोलवले. मी त्यांना म्हटले, ‘प्रचार काय असतो? मी तर तो कधी केलेला नाही.’ स्टेज परफॉर्मन्सशिवाय मी कुठेही गेले नव्हते; पण अम्मा म्हणाली, इतकी चांगली संधी मिळतेय तर तू गेले पाहिजेस. आमच्या घरात भाजपविषयी आस्था होती. शेवटी मी तयार झाल्यावर आईनेच मला छोटेसे भाषण लिहून दिले. तिचे हिंदी चांगले होते. तेच भाषण मी प्रचारसभेत वापरायला लागले. समोर दहा-पंधरा हजारांचा जमाव पाहून सुरुवातीला मला भीती वाटायची; पण विनोदने मला धीर दिला. ‘तू उत्तम करते आहेस, खरेतर तू राज्यसभेत असायला हवेस,’ असेही त्याने मला सांगितले. तेव्हा ‘मी आहे तिथे सुखी आहे’ असे उत्तर मी दिले होते.
खासदारकीच्या अनुभवानंतर आता आपण राजकीय नेता झालो आहोत असे वाटते का? व्यवस्था कशी काम करते, प्रश्न काय असतात, लोकांच्या जीवनात बदल कसा घडवायचा, हे समजून घेणे सोपे नसेलच..
असा काहीच विचार मी केला नव्हता; पण एकदा का काम सुरू केले, की मार्गदर्शन करणारे लोक असतात. मी मतदारसंघात गेले तेव्हा मला तिथले प्रश्न समजले. शिकायला मिळाले. ते सारे लोकांनीच सांगितले, समजावले. ‘लोकांची सेवा करण्याची संधी तुला मिळाली आहे, असे अम्मा मला सांगत आली. लोक अशा परिस्थितीत कसे जीवन कंठत असतील, या प्रश्नाने मात्र मला बराच काळ अस्वस्थ केले होते.
प्रचारासाठी म्हणून मी पहिल्यांदा माझ्या मतदारसंघात फिरले. पूर्वी मी चित्रीकरणासाठी या भागात आले होते; पण तेव्हा या गोष्टी दिसल्या नव्हत्या. रस्ते धड नाहीत, प्यायला पाणी नाही. हे सगळे सरकार का देत नाही? मुलांना नदी-नाले ओलांडून शाळेत जावे लागते. हे सगळे प्रश्न लोकप्रतिनिधीनेच सोडवायचे असतात. मग मी कामाला लागले. ब्रजवासीयांसाठी पुष्कळ काही केले. तेथे जातीयवाद बराच होता. मी त्यांना म्हणाले ‘तुम्ही सगळे माझ्यासाठी ब्रजवासी आहात. एकत्र असा. एकमेकांसाठी असा!’ महिलांसाठी मला पुष्कळ काम करता आले. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तेव्हा मी त्यांना घेऊन दिल्लीला गेले आणि मदत मिळवून दिली.
म्हणजे ‘खासदार’ ही भूमिकाही तुम्ही उत्तम पार पाडलीत. आता सराईत राजकीय नेता झाल्यासारखे वाटते का?
या सगळ्या गोष्टींशी काही देणे-घेणे नाही. मला फक्त माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी कर्तव्य आहे. राजकारणात मला काही कमवायचे नाहीच. मी मुळात कलाकार आहे आणि कलाकारच राहू इच्छिते! खासदार या नात्याने लोकांसाठी जे करता येईल तेवढे मी करते. वृंदावन हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी आता मी प्रयत्न करते आहे. रावाल हे एक गाव मी दत्तक घेतले आहे. तेथेही तुम्हाला पुष्कळच बदल दिसेल. संसदेत मी जी भाषणे दिली ती माझ्या मतदारसंघाशी संबंधित होती; कारण मथुरा ही कृष्णाची जन्मभूमी आहे. तिथे पुष्कळ काही गोष्टी अजून व्हायच्या बाकी आहेत. त्याबद्दल मी बोलत राहिले.
संसदेतला पहिला दिवस मला आठवतो. सारेच नवीन होते, साहजिकच मनातून मी काहीशी घाबरलेली होते; पण सुषमा स्वराज आणि अन्य सहकाऱ्यांनी मला सगळे समजावून सांगितले. सभागृहात मी सगळ्यांची भाषणे नीट ऐकत असे. विरोधी पक्षाच्या सदस्यांचे म्हणणेही सतत ऐकत आले. माझ्या हातून जे झाले, त्याचा मला आनंद आहे. मी इथे सेवेसाठी आले आहे, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे!
संपूर्ण मुलाखतीसाठी : https://rb.gy/jywbjg