Ambati Rayudu ( Marathi News ) : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने अवघ्या 10 दिवसांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुढील काही काळ मी राजकारणापासून दूर राहणार असल्याचंही रायुडूने सांगितलं आहे. 28 डिसेंबर रोजी अंबाती रायुडूने जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत वाएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रायुडूने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र पक्षप्रवेश होऊन 10 दिवसही उलटत नाही तोच रायुडूने आपण या पक्षातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे.
अंबाती रायुडूने आपल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी 'एक्स'वर पोस्ट लिहिली असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "मी वाएसआरसीपीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सध्या मी राजकारणापासून दूर राहणार असून योग्यवेळी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल."
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानातील निवृत्तीनंतर राजकीय रणांगणात उतरलेल्या अंबाती रायुडूने इतक्या कमी कालावधीत ब्रेक का घेतला, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असून सध्या तरी रायुडूने यामागील कारण स्पष्ट केलेलं नाही.
अंबाती रायुडू आणि क्रिकेट कारकीर्द
अंबाती रायडूला फार कमी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 37 वर्षीय रायडूने IPL 2023 नंतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रायुडू शेवटचा आयपीएल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून खेळला होता. अंबाती रायुडूने भारतासाठी 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47.05 च्या सरासरीने 1,694 धावा केल्या. नाबाद 124 धावा, ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय, रायुडूने 6 टी-20 सामन्यांमध्ये 10.50 च्या सरासरीने केवळ 42 धावा केल्या. याशिवाय रायुडूच्या नावावर 97 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6,151 धावा आहेत.