कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जस-जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तस-तसे तेथील राजकारण तापू लागले आहे. गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सुभाष चंद्र बोसांचा जुना मुद्दा उचलला आणि कोरोना लशीवरूनही केंद्र सरकारला निशाण्यावर घेतले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही, तर त्यानी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावरही वैयक्तीक भाष्य केले.
अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडत ममता म्हणाल्या, मी असा गृहमंत्री यापूर्वी कधीच पाहिला नाही. एका गृहमंत्र्याने देश चालवायला हवा. मात्र, हे छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्थ आहेत. लोकांच्या घरी जेवन घ्यायला जातात आणि फोटो काढतात. आपला हल्ला कायम ठेवत ममता म्हणाल्या, देशाची परिस्थिती पहा आणि देशाच्या सीमा पाहा, अर्थव्यवस्था कुठे गेली आहे?
पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या बैठकीनंतर, आज कोरोना लशीवर बोलताना ममता म्हणाल्या "लशीच्या बाबतीत एवढ्या मोठ्या चर्चेत त्या सामील झाल्या, मात्र, लस कधी येणार, हे कुणालाही ठाऊक नाही. तरीही गेल्या सहा महिन्यांपासून ते "भाषाण" देण्यात व्यस्त आहेत."
शेतकरी आंदोलनावरही केलं भाष्य -शेतकरी आंदोलनावर बोलताना ममता म्हणाल्या, केंद्र सरकारची सर्व लोकांच्या, सर्वप्रकारच्या मुलभूत अधिकारांवर ताबा मिळविण्याची इच्छा आहे. ते शेतकऱ्यांच्या लोकशाही अधिकारांवर अंकुश लाऊ शकत नाहीत. कृषी कायदा अवैध आहे. एखादा कायदा शेतकऱ्यांसाठी नाही, तर काळाबाजार करणाऱ्यांसाठी असेल, तर बे कायदेशी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्याचे अधिकार का काढू इच्छिते?
भाजपवर हल्ला चढवत ममता म्हणाल्या, "भाजपला केवळ एक व्यक्ती, एक राजकारण आणि एकच नेता असावा, असे वाटते, बाकी काही नाही. देश आपल्या सर्वांसाठी आहे. स्वातंत्र्य संग्रामात ते कुठे फिरत होते. त्यावेळी त्यांनी देशाबरोबर विश्वास घात केला. मी पूर्णपणे शेतकऱ्यांबरोबर आहे. जर त्यांनी मला बोलावले, तर मी त्यांच्या बाजूने मैदानात उतरायला तयार आहे," असेही ममता म्हणाल्या.