नवी दिल्ली - देशाचे संसदेत आपण पोहोचलं पाहिजे हे प्रत्येक राजकारणी लोकांचं स्वप्न असंत. मात्र, नागरिक म्हणून आपण देशाची संसद पाहिली पाहिजे, ज्या लोकशाहीवर आपला देश चालतो, जगातील सर्वात मोठ्या ज्या लोकशाहीचं आपण प्रतिनिधित्व करतो, त्या लोकशाहीच मंदिराला एकदा तरी भेट दिली पाहिजे, असंही प्रत्येक जागरुक भारतीयास वाटते. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटर्स आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनाही संसद व संसदेतील कामकाज पाहण्याचा मोह आवरता येत नाही. इंन्फोसेस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्तीही त्यास अपवाद नाहीत.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी आज संसद सभागृहाला भेट दिली. यावेळी, संसद पाहून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. खूपच सुंदर... अतिशय सुंदर... वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला खूप वर्षांपासून संसदभवन पाहण्याची इच्छा होती. आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. येथील संसद भवनातील कलाकूसर, संस्कृती आणि इतिहास सर्वकाही अतिशय सुंदर आहे, असे सुधा मूर्ती यांनी म्हटलं. यावेळी, खासदार बनून येऊ इच्छिता का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, हात जोडून नम्रपणे सुधा मूर्ती यांनी नकार दिला. तसेच, मी जिथे आहे तिथे आनंदी आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी, पत्रकारांसह सर्वांनीच हसून दाद दिली.
कोण आहेत सुधा मूर्ती
इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका व कन्नड आणि इंग्रजी भाषेतील भारतातील प्रसिद्ध लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली, ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये भाग घेतला आहे. कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना कॉम्प्युटर आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि हार्वर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाची स्थापना केली. त्या इन्फोसेसचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.