नवी दिल्ली - लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकमत वृत्त समुहाचे कौतूक केले. शरद पवार यांचा लोकमत संसदीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना, केवळ जनतेच्या माझ्यावरील विश्वासामुळेच संसदेत गेल्या 52 वर्षांपासून मी कार्यरत आहे, असे पवार यांनी म्हटले. त्यामुळेच, मी 52 वर्षांच्या कार्यकाळात कधीही सदनातील वेलमध्ये जाऊन गोंधळ घातला नाही. कारण, संसदेत चर्चा होणं गरजेचं आहे.
मी लोकमतचा नियमित वाचक असून लोकमतने लोकांच्या समस्येवर लक्ष देण्याच काम केल आहे. लोकमत आणि महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीत लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्जा म्हणजेच बाबूजींचे मोठे योगदान असल्याचं पवार यांनी सांगितलं. तसेच मला मिळालेल्या पुरस्काराबद्दत सर्वप्रथम मी जनतेच आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच मी 52 वर्षात संसदेत सेवा देऊ शकलो. जनतेनं दाखविलेल्या विश्वासामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच मी कधीही संसदेतील सभागृहात वेलमध्ये जाऊन गोंधळ घातला नाही. लोकांनी ज्या चर्चेसाठी आपल्याला येथं पाठवलंय ती चर्चा सातत्यानं घडत राहावी, संसदेच कामकाम कायम सुरू राहावं, असं मला वाटतं, असेही पवार यांनी म्हटले. मी सभात्याग केला, पण वेलमध्ये जाऊन कामकाज बंद पाडण्याचं कधीही काम केलं नाही, असे म्हणत पवार यांनी संसदेच कामकाज बंद पाडणाऱ्या खासदारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दरम्यान, या पुरस्काराबद्दल पवार यांनी लोकमतचेही आभार मानले.