काशी - मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. मी गरिबांचे दुखं दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्याचे सरकार 2 जी घोटाळ्यात व्यस्त होती. मात्र आता 4 जी देशातील गरिबांपर्यंत पोहचलं आहे. आज जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात केला जातो. पराभवाच्या भितीपोटी महामिलावटी लोकं मला शिव्या देण्याचं काम करत आहेत. मात्र यांच्या शिव्या माझ्यासाठी आर्शीवाद बनला आहे असं त्यांनी सांगितले.
मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, स्वत: मतदान करा, इतर लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, पहिल्यांदा मतदान करा आणि जेवण करा. मतदान केल्यानंतर स्वत:चा सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करा आणि दुसऱ्या लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केलं.
काशीमधील लोकांना मला सांगितलं इथं येऊ नका, आम्ही सांभाळून घेतो. आज प्रत्येक काशीतील रहिवाशी मोदी बनून निवडणूक लढवत आहे. जनसहभागातून काशी विकासाच्या मार्गावर जात आहे. काशीसोबत जोडल्याने मी धन्य झालो. माझं जीवन काशीच्या कामी आलं त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा अंतिम टप्पा आला आहे. काँग्रेस-भाजपाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीत काँग्रेसकडूनही गरिबांना आकर्षित करण्यासाठी न्याय योजना आणली. या योजनेतंर्गत देशातील 20 कोटी गरीब जनतेला वर्षाला 72 हजार रुपये देण्याचं आश्वासन जनतेला देण्यात आलं. मात्र काँग्रेसने इतकी वर्ष गरिबी नव्हे तर गरिबांना हटविण्याचं काम केलं. ज्या लोकांना 70 वर्षांत देशातील जनतेवर अन्याय केला ते लोकांना न्याय काय देणार असा प्रश्न भाजपाने काँग्रेसवर उपस्थित केला होता. त्यामुळे निवडणुकीत गरिबांना केंद्रबिंदू बनवत भाजपा-काँग्रेसच्या राजकारणात देशातील जनता कोणाला साथ देते हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.