बंगळुरू - राज्यसभा जागेसाठी देशातील ४ राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष खबरदारी घेत आहे. त्यातच कर्नाटकात २ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची बातमी समोर आली आहे. याठिकाणी जनता दलाच्या आमदाराने काँग्रेसला उघडपणे मतदान केले आहे. त्यामुळे कर्नाटकात जनता दलाच्या आमदाराचं काँग्रेस प्रेम चर्चेत आले आहे.
कर्नाटकात ४ जागांसाठी मतदान होत आहे. याठिकाणी चौथ्या जागेसाठी भाजपा, काँग्रेस आणि जदयू यांच्यात चुरस आहे. मात्र जनता दल एसचे आमदार श्रीनिवास गौडा आणि श्रीनिवास गुब्बी यांनी क्रॉस वोटिंग केले. श्रीनिवास गौडा यांना कुणाला मतदान केले असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी बेधडक काँग्रेसला मतदान केले असं सांगितले. कारण आय लव्ह काँग्रेस असं ते म्हणाले. याआधीही श्रीनिवास गौडा जनता दल एसला सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.
जनता दल सेक्युलरचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. काँग्रेस नेते सिद्धरमैय्या जेडीएसच्या आमदारांना काँग्रेसला मतदान करण्यासाठी दबाव आणतायेत असं ते म्हणाले होते. कर्नाटकात एकूण २२४ सदस्यांपैकी काँग्रेसकडे ७०, भाजपाकडे १२१ तर जदयूकडे ३२ आमदार आहेत. राज्यसभेत जाण्यासाठी उमेदवाराला ४५ मतांची गरज आहे.
आत्ताच्या संख्याबळानुसार, भाजपाचे २, काँग्रेसचा १ सदस्य सहजपणे निवडून जाऊ शकतात. परंतु चौथ्या जागेसाठी याठिकाणी चुरस निर्माण झाली होती. या जागेसाठी तिन्ही पक्षाने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले. काँग्रेसनं जयराम रमेश, मन्सूर अली खान, भाजपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते जग्गेश, आमदार लहेर सिंह सिरोया, जेडीएसने डी कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. चौथ्या जागेसाठी याठिकाणी तिन्ही पक्षामध्ये चुरस होती.
क्रॉस वोटिंग झाल्यानंतर कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, श्रीनिवास गौंडा काँग्रेसला मतदान करतील असं मी आधीच बोललो होतो. त्यांनी जेडीएसला मत दिले नाही. काँग्रेसनं आज त्यांचा खरा चेहरा दाखवला. काँग्रेस ही भाजपाची बी टीम आहे. देशात भाजपा पुढे जाण्यासाठी काँग्रेसच दोषी आहे असं त्यांनी आरोप केला आहे.