नवी दिल्ली, दि. 27 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टान दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राम रहीम हे विराट कोहली, आशिष नेहरा यांना क्रिकेटची ट्रेनिंग आणि बॉक्सर विजेंदर सिंगला बॉक्सिंग शिकवल्याचा दावा करताना दिसत आहेत.
मी विराटला कोचिंग दिल्यामुळेच विराट कोहली इतका मोठा क्रिकेटपटू होऊ शकला असा दावा या व्हिडीओत त्यांनी केला आहे. आज तकने या व्हिडीओची सत्यता तपासली आहे. वर्ष 2010 चा इंटरनेटवर एक व्हिडीओ आहे. यामध्ये विराट कोहली आणि आशिष नेहरा राम रहीमसोबत स्टेजवर बसले असून राम रहीम दोघांना काही टिप्स देत आहे. जवळपास एका मिनिटाच्या या व्हिडीओत राम रहीम विराट आणि नेहराला रागावर नियंत्रण ठेवण्याच्या आणि कसून मेहनत करण्याच्या टिप्स देताना दिसत आहेत, पण क्रिकेटशी निगडीत कोणतीही खास टिप देताना ते दिसत नाहीत. व्हिडीओ पाहून हा विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दितील सुरूवातीच्या दिवसांचा असल्याचं लक्षात येतं. व्हिडीओमध्ये राम रहीमच्या टिप्सनंतर नेहरा, विराट आणि विजय दहिया हे राम रहीमसोबत फोटो काढतात आणि राम रहीम त्यांना मॅचसाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून राम रहीमने विराटला क्रिकेट शिकवल्याचं कुठेही सिद्ध होत नाही.
व्हिडीओमध्ये राम रहीम विजेंदर सिंगचाही उल्लेख करतात. त्यांच्याकडून बॉक्सिंग शिकल्यामुळेच विजेंदरला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं आणि तो जगप्रसिद्ध झाला असं व्हिडीओमध्ये राम रहीम बोलताना दिसत आहे. मात्र त्यांचा हा दावा देखील खोटा निघाला आहे. इंटरनेटवर एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये विजंदर स्टेजवरून राम रहीमचे आभार मानतोय आणि राम रहीम विजेंदरला आशीर्वाद देत आहेत पण हा व्हिडीओ एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा असल्याचं लगेच लक्षात येतं. पण व्हिडीओ पाहून विजेंदरने राम रहीमकडून ट्रेनिंग घेतल्याचं कधीच जाणवत नाही.
दोन्ही व्हिडीओ पाहून विराट किंवा विजेंदरला राम रहीमने ट्रेनिंग दिली असल्याचं कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे राम रहीमचा दावा खोटा ठरतो. एखाद्या प्रोडक्टसोबत अथवा व्यक्तीसोबत जोडले गेल्यानंतर नावाचा कसा गैरवापर केला जातो याची ही चांगली शिकवण आहे. त्यामुळे या घटनेनंतर अशा खेळाडूंनीही जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे.