आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधक एकजुट दाखवत आहेत. बिहारमधील पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर आज आणि उद्या बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस पावले टाकत आहे. कॉंग्रेससह २४ पक्षांचे नेते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. ज्या उत्तर प्रदेशातून देशाच्या सत्तेचा मार्ग ठरतो, त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे.
कॉपी करणारी लोक कधीच पास होत नाहीत, असा उपरोधिक टोला अखिलेश यांनी लगावला. "पाटणा नंतर बंगळुरू येथे बैठक होत आहे याचा मला आनंद आहे. देशातील दोन तृतीयांश जनता भाजपाला पराभूत करणार असून, मला आशा आहे की जनता भाजपाचा दारुण पराभव करेल. मी कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करेन कारण त्यांनी भाजपाला पराभूत केले. मला सर्व कानाकोपऱ्यातून माहिती मिळत आहेत. देशातून भाजपाचा नायनाट होईल. जे लोक कॉपी करतात त्यांना कधीच यश मिळत नाही. विरोधकांची बैठक होत आहे अशी माहिती मिळताच त्यांनी आपली बैठक बोलावली आहे", अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपापली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनडीएची नवी दिल्लीत बैठक होत आहे, तर बंगळुरूत सोमवारी आणि मंगळवारी २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.
एनडीएमध्ये सध्या कोण?सत्तेत असलेल्या एनडीएमध्ये सध्या २४ पक्ष आहेत. यात भाजप, अण्णाद्रमुक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, नॅशनल पीपल्स पार्टी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आयएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिझो नॅशनल फ्रंट, टीएमसी, आयपीएफटी (त्रिपुरा), बोडो पीपल्स पार्टी, पीएमके, एमजीपी, अपना दल, आसाम गण परिषद, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, शिरोमणी अकाली दल संयुक्त (ढींढसा) आणि जनसेना (पवन कल्याण) यांचा समावेश आहे.