Parliament Session : राज्यसभा खासदार जया बच्चन अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होतात. तीन दिवसांपूर्वीच राज्यसभेतील कामकाजादरम्यान उपसभापतींनी त्यांच्या नावासोबत अमिताभ बच्चन यांचे नाव जोडल्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या. महिलांना स्वतःचे अस्तित्व नाही का, असा प्रश्न विचारत त्यांनी, मला फक्त जया बच्चन म्हणा, असे म्हटले होते. मात्र, आज(दि.2) झालेल्या कामकाजादरम्यान त्यांनी स्वत:च आपले पूर्ण नाव घेतल्यामुळे सभागृह एकच हशा पिकला.
कामकाजादरम्यान राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बंगालचे खासदार जवाहर सरकार यांचे नाव उच्चारले असता, जया बच्चन अचानक उठल्या आणि धनखड यांना त्यांच्या जेवणाबद्दल विचारले. "सर तुम्हाला जेवणाची सुट्टी मिळाली का? कारण, तुम्ही पुन्हा पुन्हा जयराम रमेश यांचे नाव घेत आहात. त्यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण पचत नाही."
मी जया अमिताभ बच्चन...हा प्रश्न विचारण्यापूर्वी जया बच्चन यांनी आपले पूर्ण नाव जया अमिताभ बच्चन असे घेतले होते. त्यांनी आपले पूर्ण नाव घेताच सभापती धनखड जोराने हसायला लागले. त्यांच्यासोबत इतर सर्व खासदार आणि शेवटी स्वतः जया बच्चनदेखील हयासला लागल्या. दरम्यान, जया बच्चन यांच्या प्रश्नावर उत्तर देताना धनखड म्हणतात, "मी आज दुपारचे जेवण उशीरा केले, पण जयराम रमेश यांच्यासोबतच केले. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात पुन्हा हशा पिकला.
29 जुलै रोजी जया का संतापल्या?आज जया बच्चन यांचा मूड चांगला होता, पण 3 दिवसांपूर्वी(29 जुलै) रोजी सभागृहाच्या कामकाजादरम्यान जया बच्चन चांगल्याच संतापल्या होत्या. भाषणापूर्वी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांचे पूर्ण नाव 'जया अमिताभ बच्चन' असे घेतले होते. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. "तुम्ही मला फक्त जया बच्चनला हाक मारली असती, तरी चालले असते. महिलांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले का जाते, त्यांची काही स्वतःची ओळख आणि कर्तृत्व नाही. त्यामुळे तुम्ही मला फक्त जया बच्चन म्हणा, " असे त्या म्हणाल्या होत्या.