राहुल गांधी यांनी आज लुधियानामध्ये पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला. चन्नी यांनाचा पुन्हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनविण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धू यांनी पंजाबचा मुख्यमंत्री होण्यासाठी गेल्या काही महिन्यांत आकाश-पाताळ एक केले आहे. कॅप्टन अमरिंदर यांचाही त्यानी काटा काढला. परंतू, तेव्हा देखील सिद्धू यांचे स्वप्न भंगले होते. अशातच आजही नावाची घोषणा न झाल्याने दुखावलेल्या सिद्धूंवर फुंकर घालण्याचे काम राहुल गांधी यांनी केले.
मी नवज्योत सिंग सिद्धू यांना गेल्या ४० वर्षांपासून ओळखतो हे त्यांनाही माहिती नाही. मी जेव्हा दून स्कूलमध्ये होतो, तेव्हा शाळेबाहेर त्यांना भेटलो होतो. ते ओपनिंग बॉलर होते. माझ्या मित्राने मला त्यांचे नाव सांगितले. सिद्धू यांनी आमच्या टीमला १०६ धावांनी हरविले होते. तेव्हाच मला या माणसाची ताकद समजली होती. हा माणूस सरावासाठी कित्येक तास देतो. आज ते कॉमेंटेटर, कॉमेडियन आणि आता राजकीय नेते बनले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
लुधियानामध्ये एका आभासी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमध्ये अनेक हिरे आहेत. मी 2004 पासून राजकारणात आहे. मलाही काही अनुभव आणि दूरदृष्टी आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हिऱ्याची निवड करणे अवघड काम आहे. आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. कोणताही राजकारणी १५ दिवसात जन्माला येत नाही. टीव्हीवर दिसणारा नव्हे, तर जो संघर्ष करतो तो राजकारणी होतो.