भावनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौ-यावर असून, मागच्या एक महिन्यातील त्यांचा हा तिसरा गुजरात दौरा आहे. भावनगरमध्ये रविवारी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या महत्वकांक्षी 'रो-रो फेरी सेवेच्या' पहिल्या टप्प्याचे उदघाटन केले. रो-रो हा जलवाहतुकीचा प्रकल्प असून, या प्रकल्पातंर्गत घोघा ते दाहेज बोटीने प्रवास करता येईल. रो-रो हा दक्षिण आशियातील सर्वोत्तम प्रकल्प असून, यामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र जोडले जाणार आहेत.
रो-रो फेरी सेवेतंर्गत प्रवाशांबरोबर गाडयाही बोटीमधून नेता येतील. त्यामुळे इंधन, वेळेची बचत तर होईलच पण रस्त्यावरचे ट्रॅफीकही कमी होण्यास मदत होईल. 2012 साली या 650 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. रो-रो सेवेच्या उदघाटनच्या निमित्ताने भाषण करताना मोदींनी गुजरातच्या जनतेला दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मोदींनी यावेळी भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2014 च्या आधी केंद्रात सतेवर असलेल्या काँग्रेसने गुजरातचा विकास रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केला असा आरोप केला. रो-रो फेरी सेवा भले घोघा ते दाहेज दरम्यान असली तरी, संपूर्ण देशासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रोजेक्टमुळे सहा कोटी गुजराती जनतेचे स्वप्न पूर्ण होईल असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसने गुजरातचा विकास रोखण्याचे किती प्रयत्न केले ते सांगण्याची एकही संधी सोडली नाही. वापी ते कच्छच्या मांडवीपर्यंत विकास रोखण्यात आला. उद्योग पर्यावरणाच्या नावाखाली बंद करण्याची धमकी दिली. विकासाला टाळ लावण्याची धमकी दिली. मी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी मला किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित आहे असे मोदी म्हणाले. वर्षअखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये आतापासूनच निवडणुकीचे पडघम वाजत असून, काँग्रेस आणि भाजपात परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे.