'आय लव्ह केजरीवाल' स्टीकर रिक्षावर चिकटवलं, पोलिसांनी 10 हजारांचं चलन फाडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 03:59 PM2020-01-28T15:59:07+5:302020-01-28T16:00:14+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली - दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे असून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं पारडं जड आहे. सर्वसामान्य माणूस केजरीवाल यांच्याबाजुने असल्याचं दिसून येतंय. म्हणूनच, रिक्षावालेही केजरीवाल यांचा प्रचार करत आहेत. पण, एका रिक्षावाल्यास केजरीवाल यांचा प्रचार चांगलाच महागात पडलाय. कारण, दिल्ली पोलिसांनी संबंधित रिक्षावाल्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना 65 उमेदवारांनी आव्हान दिले आहे. केजरीवालांना आव्हान देणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहे. त्यामध्ये काही वकील तर काही वृत्तवाहिन्यांचे मालक आहेत. त्यामुळे केजरीवाल यांचे समर्थक त्यांचा जोरात प्रचार करत आहेत.
एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांच्या प्रचारार्थ आय लव्ह केजरीवाल अशा आशयाचे स्टीकर रिक्षावर लावले होते. त्यामुळे, संबंधित रिक्षावाल्याकडून वाहतूक पोलिसांनी चक्क 10 हजार रुपयांचे चलन फाडले. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात रिक्षावाल्याने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. कुठल्या नियमांतर्गत हे चलन फाडले, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला आहे. 3 मार्च रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, ही घटना गेल्यावर्षीची असून केजरीवाल यांनीही ट्विट करुन याबाबत प्रश्न विचारला होता.