कराची: भारत आणि पाकिस्तान हे देश सख्खे शेजारी आहेत. त्यामुळे मी भारताइतकंच प्रेम पाकिस्तानवरही करतो, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अय्यर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले होते. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपाला याचा फायदा झाला होता. त्यानंतर अय्यर यांचे नवे वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. गेल्या आठवड्यात त्यांनी कराची येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा अखंडपणे सुरू राहणे, ही काळाची गरज आहे. याबाबत पाकिस्तानची सध्याची भूमिका सकारात्मक असली तरी भारताकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परंतु, भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा अव्याहतपणे सुरूच राहिली पाहिजे, असे अय्यर यांनी सांगितले. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर आपले सारखेच प्रेम असल्याचेही त्यांनी म्हटले. मी भारतावर प्रेम करतो म्हणूनच माझे पाकिस्तानवरही प्रेम आहे. भारतानेही शेजारधर्माचे पालन करून पाकिस्तानवर प्रेम करावे, असा सल्लाही यावेळी अय्यर यांनी दिला. यावेळी अय्यर यांनी भारत-पाक द्विपक्षीय चर्चेसंबंधात मोदी सरकारच्या भूमिकेविषयीही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. काश्मीर आणि भारतातील दहशतवाद हे द्विपक्षीय चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या काळात अवलंबण्यात आलेल्या धोरणाचा अवलंब करावा, असेही अय्यर यांनी सांगितले.
पाकिस्तानवर माझं भारताइतकंच प्रेम- मणिशंकर अय्यर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 8:37 AM