दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशावेळी प्रसिद्ध पत्रकार शीला भट्ट यांनी मोदी जेव्हा एमए करत होते, तेव्हा मी त्यांना भेटलेले, असा दावा केला आहे. तेव्हा त्यांचे आणि आपले शिक्षक एकच होते असेही त्यांनी म्हटले आहे.
न्यूज एजन्सी एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी भट्ट यांची मुलाखत घेतली. यामध्ये भट्ट यांनी मोदी एमए करत होते असे म्हटले आहे. १९८१ मध्ये मी मोदींना पहिल्यांदा भेटलेले. त्यांचे शिक्षक प्रोफेसर प्रवीण सेठ होते. तेच माझेही शिक्षक होते. तेव्हा मोदी सेठ यांच्या घरी नेहमी यायचे. मी देखील तिथे जात होते, असे शीला भट्ट म्हणाल्या.
तेव्हा मोदी खूप अभ्यास करायचे, मला खूप काही आठवतेय पण ही वेळ नाहीय त्या गोष्टी सांगण्याची. नुकतीच प्राध्यापकांच्या पत्नी सुरभी यांचा मृत्यू झाला, तेव्हा मोदी यांनी त्यांच्या मुलाला फोन केला होता, असे त्या म्हणाल्या.
मोदी एमएम शिकत होते. मी त्यांच्या एका वर्गमैत्रिणीलाही ओळखते. ती वकील आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा केजरीवाल आणि काँग्रेस नेते मोदींच्या शिक्षणावरून सवाल करत होते तेव्हा मी त्यांच्याशी बोलले होते. तुम्ही जर त्यांच्या क्लासमेट असाल तर यावर काहीतरी बोला. यावर त्यांनी मी यावर काहीही बोलणार नाही, असे तीने सांगितल्याचे भट्ट म्हणाल्या.
शीला भट्ट या त्यांच्या काळातील फायरब्रँड पत्रकार होत्या. त्यांनी दीर्घकाळ गुजरातच्या राजकारणावर काम केलेले आहे. 1987 मध्ये त्यांनी 'द इलस्ट्रेटेड वीकली'साठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुलाखत घेतली होती. काही दिवसांपूर्वी याच मुलाखतीदरम्यान दाऊदसोबत घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दाऊदसोबत दिसलेली महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट आहे, जी त्यावेळी पत्रकार होती, असा खोटा दावा काही लोकांनी केला होता.