मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 02:33 PM2018-07-28T14:33:44+5:302018-07-28T14:56:22+5:30

मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ​​​​​​​

I missed a golden chance to become CM, says Mallikarjun Kharge | मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

googlenewsNext

बंगळुरू- आपली मते थेट, निर्भिडपणे व्यक्त करणाऱ्या मल्लिकार्जून खर्गे यांनी आपण कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी 2004 साली गमावली अशी नेहमीच्याच स्पष्ट शब्दांमध्ये खंत व्यक्त केली आहे. मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत.

2004 साली काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी होती असं मत त्यांनी काल माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंह यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 2004 साली माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा आणि आपल्यामध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात काय चर्चा झाली हेसुद्धा त्यांनी यावेळेस सांगून टाकले. 'तू सरळस्पष्ट बोलणारा नेता आहेस आणि तू दुसऱ्या बाजूकडून कोणताही सल्ला विचारात घेणार नाहीस'. असे देवेगौडा आपल्याला 2004 साली नेतानिवडीच्यावेळी दिल्लीमध्ये म्हणाले होते. तसेच ''ते (देवेगौडा) मुख्यमंत्री असताना विरोधीपक्षनेता म्हणून मी (खर्गे) टिकाकाराच्या भूमिकेत होतो म्हणून त्यांनी धरमसिंह यांची 'जुळवून घेणारा नेता' म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली'' असे खर्गे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एच. के. पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनामुळेही माझ्या भविष्यावर परिणाम झाला. या पुस्तकामध्ये जनता दल सेक्युलरवर टीका केली असल्याचे देवेगौडा यांनी सरकारस्थापनेच्या आधी लक्षात आणून दिले होते अशी आठवण खर्गे यांनी सांगितली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पूत्र एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे पाहात,'' ही घटना 2004 साली झाल्याचे सांगितले. मी खोटे बोलत नाही, वाटल्यास तुम्ही (कुमारस्वामी) तुमच्या वडिलांना विचारून पाहा'' असेही सांगितले.

खर्गे यांनी यावेळी धरमसिंह यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. देवेगौडा यांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्यावर धरमसिंह यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले सहकार्य मला हवे आहे असे सांगितल्याचे खर्गे म्हणाले. धरमसिंह यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. सर्वांशी सहमत होणे राजकारणात शक्य नाही. मात्र सर्वांच्या मताचा आदर करण्याचा गुण धरमसिंह यांच्यामध्ये होता. त्यांनी अजातशत्रू अशी ओळख त्यामुळेच मिळवली होती.

Web Title: I missed a golden chance to become CM, says Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.