मीना कमल, लखनौउत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सज्ज झाले आहेत. भाजपासोबत या निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त करतानाच आठवले यांनी हे स्पष्ट केले की, जर आरपीआयला या राज्यात ३० जागा मिळाल्या, तर भाजपासोबत आम्ही निवडणूक लढवू. भाजपाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. लखनौत पत्रकारांशी बोलताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यात बसपाला आरपीआयचा पर्याय उभा करण्याचा दावा केला. आगामी निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करतील, असे सांगून आठवले म्हणाले की, बसपा केवळ दलितांच्या मतांचा सौदा करीत आहे, तर दलित, अल्पसंख्यांक आणि सवर्णातील आर्थिकदृष्ट्या मागास यांच्यासाठी संघर्ष करणे, हे आरपीआयचे ध्येय आहे. आठवले म्हणाले की, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती हटवून कांशीराम यांच्या मूर्ती स्थापन करण्याचे जे काम केले आहे ते बाबासाहेबांचा अवमान करणारे आहे, तर महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आम्ही मोठे आंदोलन केले होते. यात आरपीआयच्या नऊ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत राज्यात अधिकाधिक निधी देण्यात येईल, तर डोक्यावरून मैला नेण्याची प्रथा बंद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यूपीच्या निवडणूक रिंगणात आठवले
By admin | Published: September 12, 2016 4:09 AM