नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक कामात स्मार्टनेस वर्क करतात हे आता लपून राहिले नाही. कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोदी सातत्याने करत असतात. सरकारी कामात कमी हस्तक्षेप आणि अधिक काम करण्यावर त्यांचा भर असतो. उत्तराखंड येथील केदारनाथ धामच्या पुनर्विकास योजनांबाबत मोदींनी एक किस्सा सांगितला. पंतप्रधानाच्या निवासस्थानी राहून ते केदारनाथ येथील विकास कामांवर कसं लक्ष ठेवतात याबाबत त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) म्हणाले की, जेव्हा केदारनाथ पुनर्विकास काम सुरू होतं तेव्हा मला तिथे प्रत्येकवेळी जाणं शक्य नव्हतं. अशावेळी ऑफिसमध्ये आढावा बैठक घेत होतो. त्यावेळी केदारनाथमध्ये काम कसं सुरू आहे? किती वेगाने सुरु आहे? हे सगळं ड्रोनद्वारे सातत्याने मॉनिटर करत होतो. आता सरकारी कामाची क्वॉलिटी पाहण्यासाठी जावं लागतं. इन्सपेक्शनसाठी जायचं असेल तर त्याठिकाणी मी जाण्यापूर्वी सगळं काही ठीक असते. परंतु आता मी ड्रोनद्वारे सगळं काही पाहू शकतो हे त्यांना माहिती नसतं. मी निरीक्षणासाठी येतोय हे सांगण्यासाठी आवश्यकता नाही. मी ड्रोन पाठवतो त्याने कळतं. मी कामाची माहिती घेतल्याचं समोरच्याला कळतही नाही अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच प्रत्येक महिन्याला विकासकामांचा आढावा घेतला जातो. विकासकामांचे काय सुरू आहे? प्रत्येक राज्यात विकास कामं कुठपर्यंत आली आहेत त्याचा आढावा घेतला जातो. मी दर महिन्याला याचा आढावा घेतो. सर्व राज्यांचे मुख्य सचिव स्क्रीनवर असतात. अनेक विषयांवर चर्चा होते. ज्याठिकाणी विकासकामे सुरू आहेत तेथील ड्रोनचे लाईव्ह प्रेझेंटेशन द्यावं असा आग्रह मी अधिकाऱ्यांना करतो. त्यामुळे निर्णय घेण्याची तयारी होते असं पंतप्रधान मोदींनी सांगितले.
प्रगती मैदानावर इंडिया ड्रोन फेस्टिव्हल
राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर दोन दिवसीय 'इंडिया ड्रोन फेस्टिव्हल २०२२' च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टी सांगितल्या. कॅम्पसमध्ये आधीच पोहोचलो असलो तरी स्टेजवर थोडं उशीरा पोहोचलो असं सांगून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. प्रदर्शन बघण्यात मी इतका तल्लीन झालो होतो की वेळ कळलीच नाही. ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती जाणून आश्चर्य वाटले असून वेळ मिळाल्यास प्रत्येक स्टॉलवर जाऊन सर्वांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी भेट दिलेल्या प्रत्येक स्टॉलवर अभिमानाने सांगितलं जात होतं की, हे मेक इन इंडिया आहे, आम्ही सर्व बनवले आहे असंही पंतप्रधानांनी सांगितले.