इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या ४ मे रोजी विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्यांपैकी एका महिलेचा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय दु:खाने सांगितले की, मी मातृभूमीचे रक्षण केले पण स्वत:च्या पत्नीला वाचवू शकलो नाही.
आसाम रेजिमेंटमधील माजी सुभेदार असलेल्या या व्यक्तीने सांगितले की, मी कारगिल युद्धामध्ये लढलो आहे. भारतीय शांती सेनेचा एक भाग म्हणून मी श्रीलंकेतही अनेक दिवस होतो. मी माझ्या देशाचे संरक्षण केले. पण, मी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर माझे घर, पत्नी, गावकरी यांपैकी कोणाचेही रक्षण करू शकलो नाही. त्याचे मला खूप दु:ख वाटते.
त्यांनी म्हटले आहे की, ४ मे रोजी सकाळी आमच्या गावातील अनेक घरे संतप्त जमावाने जाळली. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची गावातील रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली. त्यावेळी पोलिस तिथे हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्यांनी गावकऱ्यांची घरे जाळली, महिलांसोबत अतिशय घाणेरडे कृत्य केले, त्या लोकांना अतिशय कडक शिक्षा देण्यात यावी.
‘केंद्राने मणिपूरमध्ये पाहणी पथके का पाठविली नाहीत?’वांशिक संघर्ष सुरू असलेल्या मणिपूरमध्ये पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथके का पाठविली नाहीत. भाजपच्या बेटी बचाओ या योजनेचे आता बेटी जलाओ योजनेत रूपांतर झाले आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
महिला आयोगाला शून्य प्रतिसादn मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने गेल्या तीन महिन्यांत तीनदा स्पष्टीकरण मागूनसुद्धा त्या राज्याचे सरकार व अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे. n ४ मे रोजी मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची व अन्य काही प्रकरणांची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे १२ जून रोजी करण्यात आली होती. विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली, असे रेखा शर्मा यांनी सांगितले.
जेव्हापासून मणिपूरचा व्हिडीओ पाहिला आहे तेव्हापासून मी ना झोपू शकले ना मला जेवण जात आहे. मला खूप राग आणि वेदना होत आहेत. महिला आणि लहान मुलांची सुरक्षा ही कोणत्याची सरकारची प्राथमिकता असायला हवी. - सेलिना जेटली, अभिनेत्री
ही भयंकर व लाजिरवाणी घटना आहे. त्या घटनेचा देशभरात निषेध होणे आवश्यक आहे. गुन्हा घडून ७७ दिवस उलटल्यानंतरही पीडित महिलांना न्याय मिळत नाही हे अतिशय गंभीर आहे. मणिपूरच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे. - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री
मणिपूरमधील गंभीर परिस्थितीमुळे मी अतिशय चिंतेत आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अपराधांना क्षमा करण्याच्या सर्व शब्दांना काहीच अर्थ नाही. - करीना कपूर, अभिनेत्री