नवी दिल्ली - काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याच्या राहुल गांधी यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपाची नेतेमंडळी आमने-सामने आलेली असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्यावरील मुस्लिम धार्जिणेपणाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी एका ट्विटच्या माध्यमातून पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, "काँग्रेस हा असा पक्ष आहे जो नेहमीच शोषितांसोबत उभा राहतो. त्यांची जात-धर्म आम्हाला फारसा महत्त्वाचा वाटत नाही. एका उर्दु वृत्तपत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा हवाला देत होय काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे, असे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यावरून भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. तर काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले होते. दरम्यान आज एक ट्विट करून राहुल गांधी यांनी आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्त दिले आहे. त्यात ते म्हणतात, रांगेत सर्वात शेवटी उभ्या असलेल्या व्यक्तीसोबत मी उभा आहे. मी शोषित, वंचित, पीडित लोकांसोबत आहे. त्यांचा धर्म, जात, आस्था माझ्यासाठी तितकीशी महत्त्वाची नाही. जे दु:खी कष्टी आहेत त्यांना जवळ घ्यायचे आहे. सर्व प्राणीमात्रांबाबत मला प्रेम आहे. मी काँग्रेस आहे."
मुस्लिम धार्जिणेपणाच्या आरोपांना राहुल गांधींनी दिले असे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:39 PM