चेन्नई - 'एक देश, एका निवडणूक' या धोरणाला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत थलायवा रजनिकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या संकल्पनेस आपले समर्थन दर्शवले आहे. एकत्रित निवडणुका झाल्यास खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होईल, असंही मत रजनिकांत यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी समाजवादी पार्टी आणि जदयूनंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, 29 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केलेल्या अभिभाषणात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यावर विचार व्हायला हवा, असे म्हटले होते
"देशाच्या प्रत्येक भागात सुरु असलेल्या निवडणुकांमुळे त्याचा शासन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. सलगच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शिवाय, निवडणुकांच्या निमित्ताने आचार संहिता लागू होण्याने विकासाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासंदर्भात सर्वांनी, गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. तसेच यावर सर्व पक्षांचं एकमत व्हावं," असे राष्ट्रपती म्हणाले होते.
‘सुशासनाविषयी सजग असलेल्या लोकांमध्ये नेहमीच देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सतत होत असलेल्या निवडणुकांमुळे प्रभावित होणारी अर्थव्यवस्था आणि विकासावरून चिंता असते. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे मनुष्यबळावर ओझे तर वाढतेच शिवाय आचारसंहिता लागू झाल्याने देशाची विकास प्रक्रियाही बाधित होते’, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली होती.