पाटणा - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली इन्कम टॅक्सचे जॉईंट कमिशनर रामबाबू गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. रामबाबू गुप्ता 2005 सालच्या भारतीय महसूल सेवेच्या बॅचचे अधिकारी आहेत. इन्कम टॅक्सच्या पाटणा विभागीय कार्यालयात जॉईंट इन्कम टॅक्स कमिशनर पदावर ते कार्यरत आहेत. या प्रकरणातील पीडित मुलगी 16 वर्षांची असून ती दक्षिण सिक्कीमच्या नामची जिल्ह्यात राहणारी आहे. पीडित मुलगी वैद्यकीय क्षेत्रात करीयर करण्यासाठी म्हणून बिहारला आली होती.
तिने गुप्ता कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या एकलव्य सुपर 50 इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीसाठी बांधण्यात आलेल्या हॉस्टेलमधल्या एका रुममध्ये रामबाबू गुप्ता राहत होते. पीडित मुलीचे वडील सिक्कीम पोलीस दलात हवालदार आहेत. ते मंगळवारी पाटण्यामध्ये तिला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी तिने रामबाबू गुप्ताने दोनवेळा आपले लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला असे वडिलांना सांगितले.
16 फेब्रुवारीला गुप्ता पीडित मुलीच्या रुममध्ये शिरला. त्यावेळी हॉस्टेलमधल्या अन्य मुली दुसऱ्या रुममध्ये टीव्ही पाहत होत्या. त्या मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी गुप्ताने पीडित मुलीला आपल्या रुमवर बोलवून घेतले व तिचा विनयभंग केला. त्याने तिच्या खासगी भागांना स्पर्श केला असे पोलिसांनी सांगितले.
लग्नासाठी गुप्ता आपल्यावर दबाव टाकत होता असे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या तक्रारीवरुन दिघा पोलिसांनी गुप्ताला अटक करुन विविध कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे असे पाटण्याचे आयजी नय्यर हसनैन खान यांनी सांगितले.