नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज एबीपी-सी व्होटर यांच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपाने पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी सर्वस्व पणाले लावले असून बड्या नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहांच्याही सभांचा नियोजन बंगालमध्ये आहे. तर, दुसरीकडे बिहार निवडणुकीतील यशानंतर एमआयएमच्या असुदुद्दीन औवेसी यांनीही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उमेदवार उभारणार असल्याचं सांगितल होतं.
मार्च आणि एप्रिल महिन्यात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार असून, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी तृणमूल काँग्रेस आणि एमआयएमच्या आघाडीचीही चर्चा रंगली आहे. एमआयएमचे प्रमुख असुद्दुदीन ओवैसी यांनी आपल्या बंगालमधील बागडोर फुरफुरा शरीफ पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्याहाती एमआयएमची कमान दिली होती. पण, अब्बास सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या डाव्या आघाडीशी हातमिळवणी केली. त्यामुळे, एमआयएम बंगालमध्ये एकटा पडला. त्याबद्दल असुदुद्दीन ओवैसी यांनी विचारलं असता, मै अकेलाही चला था, लोग आते गये और कारवा बनता गया... असे ओवैसी यांनी म्हटलंय. तसेच, योग्य वेळ येताच पश्चिम बंगालमधील एमआयएमच्या निवडणूक रणनितीविषयी सांगेल, असेही ओवैसी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, काँग्रेससह, तृणमूलचेही लक्ष ओवैसी याच्या भूमिकेकडे लागले आहे.
जनमत ममता यांच्या बाजुनेच
भारतीय जनता पार्टीसाठी पश्चिम बंगाल येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत थेट टक्कर आहे. मात्र, जनमत चाचणीनुसार सत्ता ममतांच्याच पारड्यात जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी तृणमूल काँग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ममतांना भाजपकडून यंदा कडवे आव्हान मिळणार असून, भाजपच्या वाट्याला ९२ ते १०८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळू शकतात. तृणमूल काँग्रेसला ४३ टक्के, भाजपला ३८ टक्के, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
तृणमूलच्या जागा कमी होणार
गेल्या निवडणुकीत ममतांना २११ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदा सत्ता कायम राखण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरीही मोठ्या प्रमाणात जागा घटण्याची शक्यता आहे. हीच स्थिती काँग्रेस आणि डाव्या आघाडीबाबत आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने प. बंगालकडे मोर्चा वळविला होता. भाजपने २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे.