कोलकाता : विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) केंद्रातील सत्ताधारी भाजपावर (BJP) सातत्याने निशाणा साधत आहेत. बुधवारी कोलकाता येथे ममता बॅनर्जी म्हणाल्या, 2024 च्या निवडणुकीत भाजपाचा संपूर्ण देशात पराभव होताना मला पहायचे आहे…'खेला होबे'.
एक दिवस आधी गोव्यातही ममता बॅनर्जींनी भाजपावर निशाणा साधला होता. भाजपाकडून चारित्र्य प्रमाणपत्राची गरज नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. त्या म्हणाल्या, मी तुमच्याशी स्पर्धा करायला आलेलो नाही. बाहेरच्या लोकांनी गोवा नियंत्रित करावा, असे मला वाटत नाही. मी देखील ब्राह्मण कुटुंबातील आहे, मी ब्राह्मण आहे. मला भाजपाकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही.
दरम्यान, केवळ पश्चिम बंगालमध्ये दबदबा कायम ठेवणार्या तृणमूल काँग्रेसने (TMC) इतर राज्यात देखील हातपाय पसरण्यासाठी सुरुवात केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव केल्यानंतर, ममता बॅनर्जी सतत इतर राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेससाठी जोरदार तयारी करत आहेत. अनेक काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या संदर्भात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
'संपूर्ण देशात भाजपाचा पराभव होणार'तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी दावा केला की गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये जेथे 2022 च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत, तेथे भाजपाचा सूर्यास्त झाला आहे आणि हा कल देशभरात दिसून येईल. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भगव्या संघटनेबद्दल मोठे दावे करण्याऐवजी काँग्रेसने भाजपाविरुद्ध योग्य मार्गाने लढले पाहिजे.
गोव्याच्या राजकारणात खळबळदरम्यान, ममता बॅनर्जी या 1 डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यात शरद पवार यांना भेटल्या होत्या. राष्ट्रीय राजकारणावर आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. मुंबई दौऱ्यानंतर त्या गोव्यात पोहचल्या होत्या. आता दुसऱ्यांदा गोवा दौऱ्यावर येऊन त्यांनी पवारांच्या पक्षालाच धक्का दिल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जनममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला गोव्यामध्ये जोरदार धक्का दिला आहे. गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जित केला आहे. चर्चिल यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहित तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार?ममता बॅनर्जी यांनी गोव्यात दिलेल्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल. देशात विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांसोबत ममता बॅनर्जी गेल्या काही काळात भेटीगाठी घेतल्या. मात्र, गोव्यात विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून पवारांनाच धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी 2022 मध्ये होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.