Pahalgam Attack News: लग्नानंतर पत्नीसोबत काश्मीरमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांची अत्यंत निघृर्णपणे हत्या करण्यात आली. विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची पत्नी बसून असल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. विनय नरवाल यांच्यावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. यावेळी विनय नरवाल यांच्या बहिणीने माझ्या भावाची ज्याने हत्या केलीये, मला त्याचे शीर हवे आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'माझ्या भावाला दहशतवाद्यांनी मारलं. मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय हवा आहे. मी माझ्या भावाचा मृत्यू असाच जाऊ देऊ शकत नाही", असे म्हणतानाच पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले.
वाचा >>‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
विनय नरवाल यांचे पार्थिव बुधवारी रात्री हरयाणातील कर्नालमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री सैनी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री सैनी अंत्ययात्रेतही सामील झाले. तसेच नरवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
'मलाही त्याचे शीर हवे'
मुख्यमंत्री सैनी यांच्याशी बोलताना मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांची बहीण म्हणाली, 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं मुंडक हवंय. सर, माझ्या भावाला सगळ्यांसमोर मारलं. आम्हाला न्याय हवा आहे. आपण त्या दहशतवाद्यांना असंच सोडून देऊ शकत नाही.'
हनिमूनसाठी गेले आणि दहशतवाद्यांनी संपवले
लेफ्टनंट विनय नरवाल यांचा हिमांशीसोबत १६ एप्रिल रोजी विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही हनिमूनसाठी काश्मीरमधील पहलगामला गेले होते. बैसरन घाटीत असतानाच त्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. विनय नरवाल यांचा मृतदेह तिथे पडलेला होता. त्या शेजारी हिमांशी बसलेल्या होत्या. या दृश्याने देशभरात संतापाची लाट उसळली.